विरोधी पक्षनेत्यांचे दुष्काळातही खोटारडे राजकारण

विरोधी पक्षनेत्यांचे दुष्काळातही खोटारडे राजकारण

पंकजा मुंडे सर्वाच्या आधी बांधावर पोहोचल्या त्यावेळी विरोधी पक्षनेते कुठे होते? भाजपचा सवाल

बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे हया दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी सर्वाच्या अगोदर बांधावर पोहोचल्या त्यावेळी विरोधी पक्षनेते कुठे होते? असा सवाल करून जिल्हा भाजपने धनंजय मुंडे हे दुष्काळावरून खोटारडे राजकारण करत असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

पालकमंत्री पंकजा मुंडे व राज्य सरकारवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दुष्काळाग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांना तब्बल एक महिन्यानंतर आता कुठे वेळ मिळाला आहे. शेतक-यांसोबत असलेली त्यांची दिवाळी नाटकी आहे. शेतक-यां बद्दल त्यांना खरचं सहानुभूती असती तर इतके दिवस त्यांनी कशाची वाट पाहिली? यामागे त्यांचे केवळ खोटारडे राजकारण असल्याचे भाजपने म्हटले आहे.

पालकमंत्री सर्वात आधी बांधावर

पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या विदेश दौ-यावर त्यांनी केलेली टीका हास्यास्पद आहे. ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचा हा दौरा होता. परंतु दौ-यावर जाण्यापूर्वी दहा दिवस अगोदरच म्हणजे १६ व १७ ऑक्टोबर रोजी सर्वाच्या अगोदर त्या दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी शेतक-यांच्या बांधावर पोहोचल्या. १६ तारखेला परळी तालुक्यातील दगडवाडी, टोकवाडी व तडोळी येथे प्रभाकर यमगर, मंचकराव यमगर, वैजनाथ भांगे, माणिक सातभाई यांच्या शेतात तर १७ तारखेला त्या अंबाजोगाई, धारूर, केज तालुक्यातील साकुड, चनई, उमराई, आडस, खोडस याठिकाणी चंपाबाई चाटे, महादेव गोचडे, हरिश्च॔द्र मुळे, प्रभाकर शिंदे, अनंत लाखे आदी शेतक-यांच्या शेतात जावून कापूस, सोयाबीन, ऊस व इतर पिकांची पाहणी केली तसेच ‘काळजी करू नका’, ‘पावसाने पाठ फिरवली असली तरी मी तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही’, अशा शब्दांत शेतक-यांना धीर दिला. एवढेच नव्हे तर याच दिवशी शासकीय आढावा बैठक घेवून जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेला मदतीच्या सूचनाही केल्या.

पंकजा मुंडे यांनी एक मंत्री म्हणून दुष्काळाच्या बाबतीत योग्य जबाबदारी पार पाडली आहे. शासनाच्या दुष्काळाच्या यादीत जिल्हयातील सर्वच्या सर्व अकराही तालुके त्यांनी समाविष्ट करून घेतले आहेत, त्यामुळे आता यापुढे जी मदत मिळेल ती सर्वच तालुक्याला मिळणार आहे. असे असताना विरोधी पक्षनेते गावोगांवी जावून खोटे बोलून दुष्काळग्रस्तांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Previous articleकर्नाटकी कशिदा २०१९ला दिसेल का?
Next articleसरकारची दुष्काळाची घोषणा कागदावरच ; उपाययोजना मात्र शुन्यच : मुंडे