सरकारची दुष्काळाची घोषणा कागदावरच ; उपाययोजना मात्र शुन्यच : मुंडे

सरकारची दुष्काळाची घोषणा कागदावरच ; उपाययोजना मात्र शुन्यच : मुंडे

परळी : सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी ही घोषणा केवळ जी.आर. काढण्यापुरती कागदावरच राहिली असून, प्रत्यक्षात उपाययोजना मात्र शुन्यच असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. सरकारने सर्वाधिक दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्याला तर वार्‍यावरच सोडले आहे का काय ? असा प्रश्‍न उपस्थित करताना कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशात असल्याने मुख्यमंत्री शेजारच्या जिल्ह्यात आढावा बैठका घेतात मात्र बीड जिल्ह्याला टाळत असावेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे_

एकीकडे दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मात्र ऐन दिवाळीत सण बाजुला ठेवून दुष्काळग्रस्त जनतेसोबत त्यांच्या व्यथा जाणुन घेण्यासाठी दौरा करीत आहेत. काल अंबाजोगाई तालुक्याच्या पाहणी दौर्‍यानंतर त्यांनी आज बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर भागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. अनेक शेतकर्‍यांच्या पाण्याअभावी वाळून जाणार्‍या ऊसाची तसेच कापसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. शेतकर्‍यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

यावर्षीचा दुष्काळ १९७२ पेक्षा ही भिषण आहे. सरकारने १५१ तालुके दुष्काळी जाहीर केले असले तरी, शेतकर्‍यांना आर्थिक मदत, जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय मात्र काहीच केली नाही. नोव्हेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना ३१ नोव्हेंबर पर्यंत टँकर लावु नका असे आदेश दिले असल्याचा आरोप  मुंडे यांनी केला. ३१ नोव्हेंबर पर्यंत माणसांनी आणि जनावरांनी पिण्याच्या पाण्याअभावी मरायचे का ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

मागच्या वर्षीच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी ३४ हजार ५०० रूपयांची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांच्या हातावर केवळ ६०० रूपये ठेवून ते शेतकर्‍यांची फसवणुक आणि थट्टा करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत, वीज बील संपुर्ण माफ, दावणीला चारा आणि तातडीने टँकर सुरू केल्याशिवाय आपण आगामी अधिवेशन चालु देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकर्‍यांच्या जनावरांना चार्‍याचे अनुदान ऑनलाईन देण्याच्या आदेशाची त्यांनी महंम्मद तुघलकी कारभार अशा शब्दात खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री शेजारच्या जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाच्या आढावा बैठका घेत आहेत, बीडला मात्र अद्याप अशी बैठक झाली नाही, कदाचित इथल्या पालकमंत्री विदेशातून सॅटेलाईटमधून बीडचा दुष्काळ पाहाणी करण्यासाठी गेल्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी बीडची बैठक लांबवली असावी, असा टोला त्यांनी लगावला. परळी भागातील शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्‍न अतिशय गंभीर बनला आहे, प्रसंगी आपण आपले प्राण गहान ठेवू मात्र शेतकर्‍यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहु देणार नाही, असा दिलासाही त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना दिला. निसर्गासोबतच सरकारशी दोन हात करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल, असे ते म्हणाले.

या दौर्‍यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, मोहनराव सोळंके व इतर पदाधिकरी उपस्थित होते.नागापूर येथील नागनाथ मंदिरात त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावांमधील गावकर्‍यांशी स्वतंत्र संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या.

Previous articleविरोधी पक्षनेत्यांचे दुष्काळातही खोटारडे राजकारण
Next articleमराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ पक्षाची स्थापना