दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्राकडे मागितली सात हजार कोटीची मदत

दुष्काळ निवारणासाठी राज्याने केंद्राकडे मागितली सात हजार कोटीची मदत

दुष्काळी परिस्थितीतही ऊस उत्पादकांना न्याय देण्याची आमची भूमिका – पंकजा मुंडे

लिंबा (पाथरी) : निसर्गाचा लहरीपणा, दुष्काळाचे सावट आणि हुमना रोगाचे संकट अशा गर्तेत ऊस उत्पादक शेतकरी सापडला सध्या आहे. उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करणे ही आमच्यासाठी तारेवरची कसरत असली तरी याही परिस्थितीत ऊस उत्पादकांना आम्ही वा-यावर सोडणार नाही, त्यांना न्याय देण्याचीच आमची भूमिका राहील अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांनी येथे दिली. दरम्यान, राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारने केंद्राकडे सात हजार कोटीची मदत मागितली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजच्या १७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास डाॅ. अमित पालवे, आ. आर टी देशमुख, आ. मोहन फड, योगेश्वरी शुगरचे उपाध्यक्ष प्रकाश सामत, वैद्यनाथ बॅकेचे उपाध्यक्ष विनोद सामत, एम. टी. देशमुख, जे. टी. देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, कमलाकर कोपले, दिलीप काळे, योगेश्वरीचे कार्यकारी संचालक रोहित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. परंतु यंदा मात्र नेमके उलटे झाले आणि दुष्काळाचे संकट आपल्यासमोर उभे टाकले. कारखाना चालवणं, शेतक-यांना भाव देणं आणि नेता म्हणून ऊसतोड कामगारांना न्याय देणं, ही सध्याच्या स्थितीत आमच्या साठी तारेवरची कसरत आहे. पाऊस पाडणं आपल्या हातात नाही परंतु आलेल्या परिस्थितीला आपल्याला तोंड देणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळेच मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला व जनतेला संकटात साथ देण्याचे सरकारने धोरण आखले असल्याचे  पंकजा मुंडे म्हणाल्या.

साखरेच्या दरातील चढ-उताराचा फटका ऊस उत्पादकांना बसत असल्याबद्दल  पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. साखर स्वस्त झाली म्हणून मिठाई, चाॅकलेट किंवा शीतपेयाचे दर कमी होत नाहीत मग याचा ऊस उत्पादकांवरच अन्याय का? असे सांगून साखरेचे दर वाढल्याशिवाय शेतक-यांना एफआरपी देणं शक्य होणार नाही असे त्या म्हणाल्या.

साखर कारखानदारीत पूर्वी पश्चिम महाराष्ट्राचीच मक्तेदारी होती परंतु लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ती मोडीत काढली व शेतक-यांनाच कारखान्याचा मालक बनवले. कारखान्याचा वापर राजकारणासाठी करण्याची प्रथाही त्यांनी बंद पाडली. कारखाने हे केवळ शेतक-यांच्या हितासाठी चालले पाहिजेत ही त्यांची भूमिका होती असे त्या म्हणाल्या. विदेश दौ-यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. आजचे विरोधक हे केवळ भाषणबाजीच करतात, सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी त्यांना कसलेही देणे घेणे नसल्याचे त्यांनी सांगितले. मला विदेश दौ-याचे कौतुक नाही, ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आपण हा दौरा केला असल्याचे त्या म्हणाल्या

ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते मुंडे साहेबांच्या नांवाने सरकारी योजना करून वीस कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली तसेच कामगारांच्या मजूरीत वाढ करून संप यशस्वी केल्याबद्दल ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीने गोरक्ष रसाळ, बाबासाहेब बांगर व इतर सदस्यांनी  पंकजा मुंडे यांचा यावेळी सत्कार करून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले. यावेळी शेतकरी बांधव व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article….त्या ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन
Next articleभारतमाता मोदींना पुन्हा ओवाळणार नाही !