भारतमाता मोदींना पुन्हा ओवाळणार नाही !
मुंबई : भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या सहाव्या व्यंगचित्रातून मोदी सरकारला फटकारले आहे.गेल्या निवडणूकीत खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली असल्याने आगामी निवडणूकीत पुन्हा चुक करणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दर्शविले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीच्या निमित्ताने मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात व्यंगचित्राच्या माध्यमातुन टीकेची झोड उठवली आहे. आज भाऊबीजनिमित्ताने रेखाटलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि भारतमातेला रेखाटण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमाता ओवाळण्याऐवजी गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी दिलेली आश्वासनाची यादीवर नजर टाकतानाचे दाखवले आहे.
गेल्या निवडणूकीवेळी मोदींनी भरमसाट आश्वासने दिली होती.त्याध्ये पाच वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, शेतकऱ्यांना कर्जमाफी,प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार आदी आश्वासने दिली होती. आता आगामी निवडणूक आली तरी या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे या व्यंगचित्रातून सुचविले आहे.