वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा : निरूपम
मुंबई : अवनी वाघिणी मृत्यू प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत निरूपम यांनी वनमंत्र्यांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.वनमंत्री मुनगंटीवार हे प्राण्यांच्या हत्येसाठी ओळखले जातात. मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या माफियांच्या टोळीत सामील असावेत, असा गंभीर आरोप निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मुनगंटीवार हे वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत मोठी वाढ झाली असे सांगत, अवनी वाघिण हत्या प्रकरणी वनमंत्री मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करावी अशी मागणीही निरूपम यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कालच एका समितीची घोषणा करण्यात आली असली तरी याप्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी आज केली आहे.वनमंत्री मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत असल्याचा गंभीर आरोप निरुपम यांनी केला आहे.