मुनगंटीवारांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही:मनेका गांधी 

मुनगंटीवारांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही:मनेका गांधी 

मुंबई:वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनी वाघिणीची हत्या प्रकरणात पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री मनेका गांधी यानी केली. एका इंग्रजी सायं दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वन मंत्री आणि वन खात्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मनेका यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारला खरोखरच यवतमाळमधील गरीब आदिवासींची काळजी असती तर त्यांनी आदिवासीच्या जमिनी कवडीमोलाने आपल्या उद्योजक मित्रांच्या घशात घातल्या नसत्या. आदिवासींना सरकारने दमडीही दिलेली नाही आणि त्यांच्या जमिनी आणि घरे सिमेंट कंपन्या आणि खाणींना दिल्या जात आहेत.वाघांना ठार करण्याचे आदेश मुनगंटीवार आदिवासींना खुश करण्यासाठी देत आहेत की उद्योजक मित्रांना, असा सवाल मनेका यांनी केला आहे. आदिवासींना कुणी असे विचारले का, त्यांच्या जमिनी आणि घरे गेली, सिमेंट कंपन्या आणि खाणींतील उत्खननामुळे धुरळा उडून झालेल्या प्रदूषणामुळे ते सुखी आहेत का की शतकांपासून त्यांच्यासोबत असलेल्या वन्य प्राण्यांबरोबर राहून खुश आहेत?

आदिवासींच्या जमिनी आणि घरे हिरावून घेता येणार नाहीत. अवनी वाघिणीच्या मृत्यु प्रकरणी राज्य सरकारने नेमलेली चौकशी समिती फ्रॉड आहे, असेही मनेका यांनी सांगितले. या समितीत जे तज्ञ आहेत ते संगणकावर बसून काम तरणारे आहेत. दोन तर वन खात्याचे ज्येष्ठ अधिकारीच आहेत. ते थेट वनमंत्र्यांच्याच हाताखाली काम करतात.
चौकशी समितीच्या आदेशातच वन खात्याचे समर्थन करणाऱ्या गोष्टी आहेत, अशी टीका मनेका यांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून मी मुनगंटीवार कसे वन्य प्राण्यांना ठार मारत सुटले आहेत आणि मुख्यमंत्री कसे असहाय्य आहेत ते पाहते आहे. त्यांच्याच वन खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने माझ्याकडे वेळोवेळी विरोध नोंदवला आहे. वाघिणीला नरभक्षक ठरवून ठार मारले गेले आहे ाणि मुख्य वन संरक्षकांनी विरोध केला तर त्यांना मुनगंटीवारांनी दमदाटी केल्याचा आरोप मनेका यांनी केला आहे. आता मुनगंटीवार याला काय उत्तर देतात, हे पहावे लागेल.

Previous articleगोपीनाथ मुंडे आणि मी बंद खोलीत चर्चा करताना चंद्रकांत पाटील बाहेर उभे असायचे : शेट्टी
Next articleमुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर पंकजा मुंडे उद्यापासून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार