आत्महत्या नाही, ही तर सरकारी हत्या: खा. चव्हाण
नांदेड : नापिकी, दुष्काळी परिस्थिती,कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असलेल्या नांदेडच्या उमरी तालुक्यातील तुराटी या गावातील शेतकरी पोतन्ना राजन्ना बोलपिलवाड यांनी आपल्या शेतात चिता (सरण) रचून स्वतः पेटवून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, भाजप शिवसेना सरकारची खोटी आश्वासने आणि फसव्या घोषणा शेतक-यांच्या जिवावर उठल्या आहेत. सरकारकडून वारंवार केल्या जाणा-या फसवणुकीमुळे शेतकरी निराश झाले आहेत. भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप वाया गेले आहे. रब्बीची पेरणी झाली नाही. ऑनलाईन अर्ज भरूनही कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात १६ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.
यापूर्वीही शेतक-यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्या आहेत. पोतन्ना या शेतकऱ्याकडे भारतीय स्टेट बँकेचे अडीच लाख, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४० हजार आणि सेवा सहकारी सोसायटीचे ४० हजार असे एकूण तीन लाख 20 हजार एवढे कर्ज होते. त्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्जही भरला होता. मात्र कर्जमाफीच्या तीनही याद्यांमध्ये नाव आले नाही, कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे ते निराश झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आणखी किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार कर्जमाफी देणार आहे?असा संतप्त सवाल करून पोतन्ना जिवंत असताना तर सरकारने त्यांना मदत केली नाही. सरकारमध्ये काही संवेदनशीलता शिल्लक असेल तर आता तरी तात्काळ पोतन्ना यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी खा. चव्हाण यांनी केली.
दरम्यान मयत शेतकरी पोतन्ना रामन्ना बोलपिलवाड यांच्या कुटुंबियांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आली नाही. परंतु महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. अशोक चव्हाण यांनी पोतन्ना यांच्या कुटुंबियांना पन्नास हजार रूपयांची मदत केली.
प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आ. अमरनाथ राजूरकर यांनी तुराटी या गावी जाऊन आत्महत्या केलेल्या पोतन्ना यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडून पन्नास हजार रोख रक्कम मदत म्हणून दिली. यावेळी मयत शेतक-याचा मुलगा माधव पोतन्ना बोलपिलवाड यांनी ही मदत स्विकारली.