अवनी प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी वनमंत्र्यांना विचारला जाब!
मुंबई : अवनी वाघिणीच्या मृत्यूचे पडसाद आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचे समजते आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारल्याचे वृत्त आहे. तर आजच्या बैठकीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना याबाबत जाब विचारला असल्याचे समजते. या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीत या वाघिणीला मारण्यासाठी आणलेल्या व्यक्तीचा असलेला समावेश आणि अवनी वाघिणीचे बेपत्ता असलेले दोन बछडे याकडेही शिवसेनेच्या मंत्र्यांनी लक्ष वेधल्याचे समजते.