जेट्टीच्या ठिकाणी ॲक्वा टुरिझम सुरू करणार : महादेव जानकर

जेट्टीच्या ठिकाणी ॲक्वा टुरिझम सुरू करणार : महादेव जानकर

मुंबई :   मुंबईच्या समुद्रातील सुरक्षा,मत्स्यव्यवसाय, व्यापार व प्रदूषणासंबंधीची पाहणी अरबी समुद्रात आज पदुम मंत्री महादेव जानकर यांनी केली. जेट्टीच्या ठिकाणी ॲक्वा टुरिझम विकसित करण्यात येणार असल्याचे  जानकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यात मत्स्योत्पादनात वाढ करण्यात आली असून, भविष्यात राज्यास मत्स्योत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातील मत्स्यबीज केंद्राद्वारे मत्स्यबीज आयात थांबवता येईल आणि निर्यात करण्यास राज्य सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कुलाबा येथील अरबी समुद्रात बोटीने जाऊन समुद्रातील सुरक्षा, मत्स्य व्यवसाय व व्यापार आदी मत्स्य व्यवसायसंदर्भातील बाबींची जानकर यांनी आज पाहणी केली. यावेळी मत्स्य उत्पादन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान जानकर यांनी राज्यातील मत्स्योत्पादनाची सद्यस्थिती तसेच भविष्यातील योजनांची माहिती त्यांनी दिली.

जानकर म्हणाले, राज्यात ११४ कोटी मत्स्यबीज मागणी असून ६० कोटी मत्स्यबीज उत्पादन करण्यास राज्य सक्षम आहे. नीलक्रांती योजनेअंतर्गत मत्स्यबीज केंद्राद्वारे राज्यात बीज उत्पन्न वाढवून राज्यास स्वयंपूर्ण करण्याच्या  दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. फीड अँड सीडच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टिने पहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्योगासाठी शासन ५० टक्के अनुदान देणार आहे.  राज्यात मत्स्य व्यवसायासाठी ४.१८ लाख हेक्टर क्षेत्रावर पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यात जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील २ हजार ५७९  तलाव असून जिल्हा परिषदेचे २० हजार तलाव आहेत. या तलावांच्या माध्यमातून मत्स्योत्पादन वाढविण्यात येत आहे.

आधुनिक पद्धतींचा वापर करून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्याची कारवाई शासन करीत आहे. पर्ससीन नेट वापरत असलेल्या १२२ बोटींना दंड आकारण्यात आला असून,एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींचा परवाना राज्य शासनाने रद्द केला आहे. मच्छिमारांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे मासेमारी करण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पिंजरा पदधतीच्या मत्स्यसंवर्धनाकरिता ५ गावांतील सहकारी संस्थांना नर्मदा प्राधिकरणामार्फत १००  टक्के अनुदानावर २४० पिंजरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

जानकर म्हणाले, राज्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जेट्टींचा विकास करत आहोत. नॉर्वेच्या धरतीवर ससून डॉकचा विकास करत असून, जागतिक दर्जाचे डॉक तयार करत आहोत. मच्छिमारांच्या उपयोगासाठी विशेष मरीन ट्रॅफिक ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे सागरी वाहतुकीसंबंधीची माहिती तसेच १२ नॉटिकल क्षेत्राच्या आत मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती समजण्यास मदत होणार आहे.

राज्यात ३० मत्स्यबीज केंद्रे कार्यरत असून,नवीन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे फीड आणि बीज यासाठी राज्य स्वयंपूर्ण होणार आहे.  मत्स्योत्पादनास अधिक चालना दिल्यामुळे राज्य आज मत्स्योत्पादनात देशात ७ वरून ५ व्या क्रमांकावर आला आहे. भविष्यात राज्याला मत्स्योत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे  जानकर यांनी यावेळी सांगितले.

Previous articleआधी बनवा आणि मग नावासाठी भांडणे करा : नवाब मलिक
Next articleरमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर, शांतीसागर वसाहत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार