गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची कॅांग्रेसची मागणी

गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढण्याची कॅांग्रेसची मागणी

मुंबई :  थेट परदेशी गुंतवणुकीच्या संदर्भातील अतिरंजीत व खोटे आकडे देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याऐवजी सरकारने गुंतवणुकीची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करून सुभाष देसाई यांनी सरकारच्या कामगिरीच्या माहितीसाठी दैनिक सामना वाचावा असा टोला  काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे. गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेस पक्ष गेल्या एक वर्षापासून करत आहे त्यापासून सरकार का पळ काढत आहे? असा सवाल सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले की, राज्यात आलेल्या थेट परदेशी गुंतवणुकीसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एप्रिल ते जून २०१८ पर्यंत राज्यात सर्वाधीक गुंतवणूक आली असे म्हटले आहे. परंतु रिझर्व बँकेने दिलेल्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी पाहिली तर रिझर्व्ह बँकेच्या मुंबई कार्यालयामार्फत १६ हजार १५२ कोटी रूपये गुंतवणूक आली तर याच कालवधीत दिल्ली कार्यालयामार्फत २७ हजार २४१ कोटी रूपये इतकी गुंतवणूक आली आहे. त्यामुळे यातही महाराष्ट्र दुस-या क्रमांकावरच आहे. ज्या ३० टक्के गुंतवणुकीबाबत सुभाष देसाई बोलत ती २००० सालापासून २०१८ पर्यंत राज्यात आलेली एकूण गुंतवणूक आहे. या १८ वर्षाच्या काळापैकी १४ वर्ष राज्यात काँग्रेसचे सरकार होते. हे श्रेय तत्कालीन काँग्रेस सरकारचे देसाईंनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

मुंबई कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दादरा – नगर हवेली, दीव दमण  या केंद्रशासीत प्रदेशाचा समावेश आहे. यासोबतच देशभरातील अनेक उद्योगांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत पण त्यांचे उद्योग देशाच्या इतर भागात असू शकतात. त्यामुळे गुंतवणुकीचा आकडा वस्तुस्थिती दर्शवणारा आहे का? याबाबत प्रश्न चिन्ह आहे.डीआयपीपीच्या गेल्या तीन वर्षाच्या अहवालात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र मागे पडला आहे हे दिसून आले होते. तेव्हा काँग्रेस पक्षाने सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यावेळी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण यावर्षीही चित्र बदलत नसेल तर सरकार गंभीर नाही हे दिसून येते.

दुसरीकडे कार्यान्वित झालेल्या प्रस्तावाची संख्या अधिक आहे असे सांगणे हा स्वतःची अब्रू झाकण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकार तर्फे मेक इन इंडियाच्या माध्यमांतून ३०१८ सामंजस्य प्रस्ताव येऊन ८ लाख चार हजार ८९७ गुंतवणुक आली व या माध्यमातून साडे तीस लाख लोकांना रोजगार मिळेल असे जाहीर करण्यात  आले. परंतु सध्यस्थितीत जी आकडेवारी सांगण्यात आलेली आहे. आतापर्यंत १९४ प्रस्ताव व ७४,३८६ कोटी रुपये गुंतवणूक आल्याचे शासनाने स्वतःच मान्य केले आहे. याचाच अर्थ गेल्या तीन वर्षामध्ये १० टक्के प्रस्तावही या सरकारला कार्यान्वित करता आले नाहीत. मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ च्या माध्यमातून राज्यात एकूण १२ लाख कोटींची गुंतवणूक होईल व 36 लाख रोजगार मिळतील असे जाहीर करण्यात आले होते. परंतु सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत फक्त  १८३४ कोटी रुपयांची गुतंवणूक झाली. याचाच अर्थ प्रस्ताव कार्यान्वयाचा फक्त दीड टक्का आहे.

त्यातही नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमीक रिसर्च  या केंद्र सरकारच्या पाठिंब्याने काम करणा-या संस्थेने गेली तीन वर्ष राष्ट्रीय स्तरावरती विविध राज्य सरकारांची कामगिरी पाहून स्टेट इन्व्हेस्टमेंट पोटेंशल इंडेक्स  जाहीर करत आहे. यामध्ये २०१६ साली महाराष्ट्राचा क्रमांक ५ वा, २०१७ साली ८ वा व यंदा पुन्हा पाचवा क्रमांक आला आहे. तसेच केंद्र सरकारच्या इझ ऑफ डुइंग बिझनेस मधील राज्याचे स्थान हे २०१५ पासून उतरते राहिले असून राज्य सध्या तेराव्या क्रमांकावर आहे. राज्यातील विजेचे दर उद्योगांना परवडत नाहीत व पाणी, जागा इत्यादीसंदर्भात अनेक तक्रारी उद्योग क्षेत्राकडून होत आहेत. पतंजली व अनिल अंबानी यांच्या प्रकल्पाकरिता दाखवलेली तत्परता  इतर उद्योगांसाठी दाखवली जात नाही. त्यामुळे सरकारने उगाच गमजा मारू नयेत. महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूकीबाबत अति रंजित दावे केल्याचे दिसून आल्याने याबाबत  श्वेतपत्रिका काढण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे.  कामगिरी भरीव नाही म्हणून  उद्योगमंत्री हलके शब्द वापरून मर्मावर बोट ठेवणा-या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी खोटी आकडेवारी देऊन पळ काढत आहेत असे सावंत म्हणाले.

Previous articleयेत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देणार : मुख्यमंत्री
Next articleअशोक चव्हाण लोकसभा ऐवजी विधानसभा लढवणार ?