मुख्यमंत्र्यांना वास्तवाचे भान नाही; राज्यकारभार ट्विटरवरच सुरू!: विखे पाटील

मुख्यमंत्र्यांना वास्तवाचे भान नाही; राज्यकारभार ट्विटरवरच सुरू!: विखे पाटील

मुंबई : मुख्यमंत्र्यांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. सध्या ते राज्याचा कारभार ट्विटरवरून चालवत आहेत. त्यामुळे दुष्काळात जनता पाण्यावाचून आणि जनावरे चाऱ्यावाचून राहिले तरी त्याचे त्यांना काहीच सोयरसूतक नाही, असा संताप व्यक्त करीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

विखे पाटील यांनी मराठवाडा व विदर्भाच्या दुष्काळी पाहणीदरम्यान हिंगोली आणि बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भोंगळ कारभाराचा पंचनामाच केला. ते म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे बुलडाणा जिल्ह्यातील मोहखेड गाव पाणीदार झाले, असे ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणी केली असता पाण्याची पातळी वाढलेली नसून, उलटपक्षी कमी झाली आहे. राज्यात गंभीर दुष्काळ असताना सरकार मात्र त्यासंदर्भात संवेदनशील असल्याचे दिसून येत नाही. ठोस सरकारी मदतीअभावी शेतकरी रोज आत्महत्या करीत असताना सरकारी कारभार मात्र नियोजनशून्यच आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र ट्विटवरुन राज्यात सारे काही आलबेल आहे, सगळीकडे चारा-पाणी उपलब्ध आहे, असा आव आणत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांनी बुलडाणा जिल्ह्यात चिखली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन नाफेडच्या खरेदी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. हमीभावाने शेतमाल खरेदीची सरकार केवळ घोषणा करते. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकऱ्यांचा माल खरेदीविना पडून आहे.नाफेड त्याची खरेदी करायला तयार नाही. तुरीच्या गेल्या वर्षी खरेदीचे चुकारे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी नसून, फक्त विमा कंपन्यांच्या भल्यासाठी चालवली जाते आहे. शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी १०० रूपये, १५० रूपये दिले जात आहेत. काही शेतकऱ्यांना तर केवळ एक रूपयाची नुकसानभरपाई मिळाल्याचे सांगून पीक विमा योजनेत मोठा घोटाळा असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्यासमवेत खासदार राजीव सातव, आमदार राहुल बोंद्रे आदींसह अनेक प्रमुख पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

Previous articleमाझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त अमित शहांना : मुनगंटीवार
Next articleमराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये!: खा. चव्हाण