परळीत भव्य क्रीडा संकुल उभारणीसाठी कटीबध्द : पंकजा मुंडे

परळीत भव्य क्रीडा संकुल उभारणीसाठी कटीबध्द : पंकजा मुंडे

परळी : सत्तेच्या माध्यमातून शहरासाठी चांगलं करण्याची माझी प्रामाणिक धडपड आहे, परंतु नगरपरिषद नाहरकत देत नसल्याने मोठा अडथळा आहे, असे असले तरी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून शहराला वैभव मिळवून देवू असे सांगत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जागा उपलब्ध करुन दिल्यास परळीत भव्य क्रीडा संकुल उभारू अशी ग्वाही आज येथे दिली.

वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहतीच्या वतीने शहरातील व्यापारी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष प्रकाश सामत, भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे उपाध्यक्ष विनोद सामत यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित व्यापा-यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर शहराच्या होत असलेल्या दुरावस्थेचा पाढा वाचला. नगरोत्थान योजनेच्या कामांचा वसाहतीमधील उद्योजकांना होत असलेला त्रास, उद्यानाची दुरावस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढते प्रदुषण, वाढीव जागा अशा समस्या मांडल्या व यातून काहीतरी मार्ग काढण्याची विनंती केली. वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीत उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी एक्स्प्रेस फिडर बसविण्याची मागणीही त्यांनी केली.

याप्रसंगी बोलतांना पंकजा मुंडे यांनी यात आपण जातीने लक्ष घालून प्रश्न सोडवू असे सांगितले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी परळीला उप मुख्यमंत्री असतांना एमआयडीसी मंजूर केली होती परंतु चांगल्या कामात सातत्याने खोडा घालण्याची सवय असणा-यांमुळे ते झाले नाही. आता पुन्हा मी उद्योग मंत्र्यांशी बोलून एमआयडीसी साठी सर्वे करायला लावला पण दुष्काळी परिस्थिती आणि मुबलक पाण्या अभावी मोठी गुंतवणूक येथे होणे शक्य नाही. त्यासाठी लघु उद्योगावर भर देणे हाच पर्याय असू शकतो असे त्या म्हणाल्या.

या शहरासाठी मला खूप काही करायचं आहे. मोठा निधी आणण्याचा प्रयत्नही केला पण नगरपरिषदेत सत्ता नसल्याने अडथळा येत आहे. विकास कामे करण्यासाठी नगरपरिषद नाहरकत देत नाही कारण मला चांगल्या दर्जाची कामे करायची असतात आणि आताच्या सत्ताधा-यांना ते नको असते त्यामुळे कामे करता येत नाहीत असे त्या म्हणाल्या. असे असले तरी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून प्राधिकरण तयार करून आपण शहरात विकासाची कामे करू. शहरात महिला व युवकांसाठी स्वतंत्र जिम किंवा अन्य खेळांना वाव देण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा माझा विचार आहे त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी असे त्या म्हणाल्या. परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या कामातील अडथळे दूर केले असून लवकरच हे काम सुरू होईल असेही त्यांनी सांगितले.

Previous articleमराठा आरक्षणासाठी सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये!: खा. चव्हाण
Next articleअधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आरक्षण जाहिर करा : मुंडे