मंत्री पंकजा मुंडेंमुळे गेवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरासाठी ८० लाखाचा निधी
जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेस गृहखात्याची मान्यता; टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हयात योजना राबवली जाणार
बीड : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे गेवराई शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी गृह विभागाने ८० लाख रूपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून नियोजन मंडळाने हा प्रस्ताव सादर केला होता, कॅमेरे बसविण्याची योजना टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हयात राबवली जाणार आहे.
गेवराई शहरातील महत्वाची पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, गर्दीची ठिकाणे, प्रमुख बाजारपेठा, महत्वाच्या बॅक आस्थापना, शहरातील प्रवेश मार्ग, निर्गमन मार्ग व अन्य महत्वाच्या मर्म स्थळांच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रूपये ८० लाख निधीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती बीडने नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत निधी उपलब्ध करून दिला होता. या कामास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव नियोजन विभागाने गृह विभागाकडे पाठवला होता. गृह विभागाने आज शासन निर्णय क्रमांक सीसीटी १७१८/प्र.क्र.४८/पोल ३ दि.१७ नोव्हेंबर २०१८ अन्वये या निधीला मान्यता दिली आहे.
दरम्यान, गेवराई शहरानंतर संपूर्ण जिल्हयात महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याची ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून पालकमंत्री पंकजा मुंडे हया त्यासाठी लागणारा निधी नियोजन विभागाकडून उपलब्ध करुन देणार आहेत.