“ठग्ज ऑफ महाराष्ट्र” विरोधकांचा पोस्टरद्वारे सरकारवर हल्ला
मुंबई: उद्यापासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मात्र विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेवेळी लावण्यात आलेल्या “ठग्ज ऑफ महाराष्ट्र” हे पोस्टरच सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो झळकत आहेत.
उद्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठक पार पडली.या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, शेकापचे आ.जयंत पाटील,सपाचे अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा, धनगर तसेच मुस्लिम आरक्षणासह दुष्काळावर सत्ताधा-यांना कोंडीत पडणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.
त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील,विधानपरिषेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि अभिताभ बच्चन आणि अमिर खान यांनी भूमिका केलेल्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे पोस्टर, परंतु या पोस्टरवर “ठग्ज ऑफ महाराष्ट्र” असे दर्शविण्यात येवून, आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चेहरे दाखवले आहेत. ठगबाजीची चार वर्षे असे नाव पोस्टरला देण्यात येवून, गेल्या चार वर्षात विविध विभागात कशी पिछेहाट झाली आहे ते नमूद केले आहे.
पोस्टरवर जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी वगैरे नावे दिली आहेत. या पोस्टरद्वारे सरकारवर जहरी टीका केली असून हे पोस्टर चर्चेचा विषय झाले आहे. यावरून उद्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक असणार, हे स्पष्ट झाले आहे.