मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देणार : मुख्यमंत्री

मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देणार : मुख्यमंत्री

मुंबई : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला असून, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाअंतर्गत स्वतंत्र कोट्यातून आरक्षण दिले जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली अाहे.

उद्यापासून सुरू होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालात तीन शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि अतिविशिष्ट परिस्थितीचा उल्लेख त्यांनी केला आहे. या तिन्ही शिफराशी राज्य सरकारने स्वीकारल्या असल्याचे सांगत ,राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला असून, मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागासवर्ग या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असल्याची  ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

मराठा समाजाला सामाजिक आर्थिक मागास वर्ग या प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार असून, मंत्रिमंडळाने हा अहवाल स्वीकारल्यानंतर मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या उपसमितीला सुपूर्द करण्यात येवून ही  उपसमिती आरक्षणाचे स्वरूप ठरवणार आहे.त्यानंतर हा अहवाल विधिमंडळात मांडून वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Previous articleअयोध्येतल्या रामाबरोबर दुष्काळग्रस्तांमध्येही ‘राम’ शोधा : धनंजय मुंडे
Next articleदुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत जाहीर करा : विखे