अंबरनाथ येथील झाडांना आग लावण्याच्या प्रकाराची चौकशी होणार :एकनाथ शिंदे
मुंबई : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनेने गतवर्षी अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ येथे वनविभागाच्या ८० एकर जागेवर लोकसहभागातून लावलेल्या एक लाख झाडांना समाजकंटकांकडून वारंवार आगी लावण्यात येत असल्याचा मुद्दा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चांगलाच गाजला. तब्बल १५ हजारहून अधिक लोकांनी एकत्र येऊन लावलेल्या झाडांचे रक्षण वनविभागाला करता येत नसल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यावर या प्रकाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्य शासनाने तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याची मोहीम आखली आहे. मात्र, पर्यावरण रक्षणाचे काम केवळ शासनाचे नसून जनतेचाही त्यात सहभाग असला तर त्यातून मोठी व्यापक चळवळ उभी राहील, या हेतूने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने गेली दोन वर्षे पुढाकार घेऊन अंबरनाथ तालुक्यात वनविभागाच्या जागेवर लोकसहभागातून पावणे दोन लाख झाडे लावली आहेत. गेल्या वर्षी, ५ जुलै २०१७ रोजी श्रीमलंग गड परिसरातील मांगरुळ या गावी वनविभागाच्या ८० एकर जागेवर आयोजित वृक्षारोपण महाअभियानातून तब्बल १५ हजारहून अधिक लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अवघ्या काही तासांतच एक लाख झाडे लावली होती. त्यानंतर चालू वर्षी देखील अंबरनाथ जवळील जावसई येथे ७० हजार झाडे लावली होती.
मात्र, मांगरुळ येथील झाडांना समाजकंटकांचा सुरुवातीपासूनच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या वर्षी, १९ डिसेंबर रोजी प्रथम समाजकंटकांनी येथे जाळपोळ केली होती. त्यात २० हजारांहून अधिक झाडांचे नुकसान झाले होते. मात्र, त्यावेळी वनविभागाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नव्हता. पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासही स्थानिक वन अधिकारी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, खा. डॉ. शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्यामुळे नाईलाजाने उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
मात्र त्यानंतरही वनविभागाने या झाडांच्या रक्षणासाठी आवश्यक ती पावले उचलली नाहीत. डोंगरावरील गवत कापणे, संरक्षक भिंत बांधणे, वनविभागाची चौकी उभारून कायमस्वरुपी सुरक्षारक्षक नेमणे, यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही वनविभागाने पावले उचलली नाहीत. त्यामुळेच गेल्या आठवड्यात बुधवार, १४ नोव्हेंबर आणि गुरुवार १५ नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस समाजकंटकांनी या झाडांना आगी लावल्या, ज्यात ७० टक्क्यांहून अधिक झाडे जळाली आहेत.वन अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे प्रकार होत असल्याचा आरोप खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला असून ठाण्याचे उपमुख्य वनसंरक्षक आणि अंबरनाथचे आरएफओ यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्री, वनमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, राज्यभरात लावण्यात येणाऱ्या कोट्यवधी झाडांचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचीही मागणी केली आहे.
रविवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय उपस्थित करून वनविभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
शासनाच्या विधायक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आपणहून पुढे येतात, मोठी जनशक्ती या उपक्रमांच्या पाठी उभी करतात; परंतु प्रशासनाचाच एक विभाग मात्र त्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका न घेता, आपली जबाबदारी पार पाडत नाही, हे खेदजनक असल्याचे ते म्हणाले आणि या प्रकाराच्या चौकशीची, तसेच जबाबदार वन अधिकारी आणि समाजकंटकांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांगरुळ येथील या झाडांना सातत्याने लावण्यात येणाऱ्या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, चौकशी करण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.