पटेलांसाठी भाजपने युगपुरुष शिवरायांना खुजे ठरवले : उद्धव ठाकरे
मुंबई:शिवसेना मित्रपक्ष भाजपवर रोजच सामना अग्रलेखातून जोरदार हल्ले चढवत असते.आजच्या अग्रलेखातून शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीवरून शिवसेनेने भाजपवर कडाडून टीका केली असून ,पटेलांचा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची सरकारने कमी केली. ही विकृती आणि कोत्या मनाचे लक्षण आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पटेलांचा पुतळा लय भारी ठरावा म्हणून महाराष्ट्रातील शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटली, हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप खरा ठरावा, अशाच गोष्टी घडत आहेत. शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करणे हे विकृत मनाचे लक्षण आहे आणि याविरोधात विधीमंडळात युनिटीचे दर्शन घडले पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने त्यांनी शिवरायांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचीही घोषणा करावी, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे. पटेलांच्या पुतळ्याचे कौतुक आहे, पण शिवराय हे सर्व हिंदूंचे आत्मा आणि प्राण आहेत. ते महाराष्ट्राच्या अंतरंगात आहेत. शिवरायांच्या उंचीचा एकही नेता नाही, हे फडणवीस यांनी मोदी सरकारला ठणकावून सांगावे, तरच तुम्हाला महाराष्ट्राचे मानता येईल, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
पटेलांच्या पुतळ्यावरुन ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही टीका केली. पटेलांच्या पुतळ्याकरता सरकारी तिजोरीची दारेशउघडी ठेवली पण महाराष्ट्रातील शिवरायांच्या स्मारकाची पायाभरणीही अद्याप झाली नाही, याची सरकारला खंतही वाटत नाही, असे ठाकरेंनी लिहीले आहे. पटेलांचा पुतळा आधी व्हावा आणि त्यासमोर शिवरायांसारखे युगपुरुष खुजे ठरावेत, अशी अंतस्थ योजना असल्याची शंका घेण्यास वाव आहे, असे सामनातून उद्धव ठाकरेंनी विचारले आहे.