वा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल…
भाजप सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची विधानभवन पायऱ्यावर बसून जोरदार घोषणाबाजी
राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला
मुंबई : वा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल… फडणवीस सरकार होशमें आओ…घरपोच दारु देणाऱ्या सरकारचा निषेध असो…मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पहिल्याच दिवशी पटलावर ठेवा… अशा घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि समविचारी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत सरकारला कसे ‘सळो की पळो’करुन सोडणार याची चुणूक दाखवून दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकारला जनतेच्या प्रश्नावर कोंडीत पकडण्याची रणनिती आखली असून त्यानुसार आज पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि समविचारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला.यावेळी घोषणाबाजी करतानाच ठग्ज ऑफ महाराष्ट्र असे पोस्टर फडकवून सरकारचा निषेधही नोंदवला गेला.
यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील मुख्यप्रतोद आमदार हेमंत टकले आणि काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह राष्ट्रवादीचे दोन्ही सभागृहातील आमदार सहभागी झाले होते.