आरक्षणावरून विधानसभेत रणकंदन; दिवसभरासाठी कामकाज तहकूब
मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी मराठा,धनगर,मुसलमान समाजाला आरक्षण द्यावे आणि दुष्काळी प्रश्नावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.विधानसभेचे कामकाज अध्यक्षांना
तीन वेळा तहकूब केले तर त्यानंतर गदारोळ सुरूच राहिल्याने तालिका अध्यक्षांना दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले.मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सहा मुस्लिम सदस्यांनी अध्यक्षांच्या व्यासपीठावर जाऊन घोषणा देत फलक फडकवला.तर वारंवार राजदंड उचलला तसेच एकदा तो पळवण्याचा प्रयत्न केला. सभागृहात गोंधळाचे वातावरण होत होते. अध्यक्ष व तालिका अध्यक्ष वारंंवार सदस्यांना समज देत होते. मात्र गदारोळ शमत नव्हता .
आज सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त झाला आहे; मात्र हा अहवाल नेमका काय आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. मराठा समाजाला ५२ टक्क्यांमध्ये आरक्षण देणार की ५२ टक्के वगळून आरक्षण देणार , याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. उच्च न्यायालयाने आदेश देऊन मुसलमान समाजाला शैक्षणिक ५ टक्के आरक्षण शासन देत नाही. याकडे लक्ष वेधतानाच शासनाने अजूनही धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही, असा सवालही त्यांनी केला. सरकारने कोरडवाहू दुष्काळ घोषित करावा. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये, तर फळबाग शेतकर्यांना १ लाख रुपयांचे साहाय्य घोषित करावेे, अशी मागणीही विरोघी पक्षनेत्यांनी लावून धरली केली.
सभागृहात त्यावेळी वातावरण गोंधळाचे होऊ लागले. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना सभागृहाचे कामकाज प्रथम ३० मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विखे-पाटील यांनी मागण्यांचा पुनरुच्चार केला. संतप्त विरोधी सदस्यांनी गदारोळ करीत कागदपत्रे फाडून भिरकावली, सभागृहातील मुस्लीम सदस्य अस्लम शेख, ताहीर शेख, अबू आझमी, आमिन पटेल, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, वारिस पठाण, हे मुस्लीम आरक्षणासाठी आ्क्रमक होते. अबू आझमी, अस्लम शेख, अब्दुल सत्तार आणि नसीम खान यांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.तर सतीश पाटील यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड पळविला. त्यामुळे अध्यक्षाना १५ मिनिटांसाठी आणि नंतर १० मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ चालूच राहिल्याने कामकाज चौथ्यांदा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले
दोन वाजता सभागृहाची बैठक सुरू झाली असता सदस्यांनी पुन्हा गदारोळाला सुरूवात केली.अनेक सदस्य दुष्काळग्स्तांना मदत, तर काही आरक्षणासाठी आक्रमक झाले होते. विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा प्रारंभ केल्यानंतर विरोधकांचा गोंधळ कायम राहिला.मुस्लिम सदस्य अध्यक्षांच्या व्यासपीठावर जात घोषणा देत होते. वारीस पठाण यांनी राजदंड वारंवार उचलून घोषणा देत होते. तालीका अध्यक्ष सुभाष साबणे यांना सदस्यांना वारंवार समज द्यावी लाखत होती सभागृहातील गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले.