अयोध्येतील उद्धव ठाकरेंच्या सभेचे रामायण समाप्त
सभा घेणार नसल्याचं संजय राऊत यांच्याकडून स्पष्टीकरण
मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील नियोजित सभेवरुन सुरू झालेले रामायण अखेर संपले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे अयोध्येत सभा घेणार नसल्याचे जाहीर केले. ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात सभेचे नियोजन नाही, असे त्यांनी सांगितले.
अयोध्येत २५ नोव्हेंबरला जाण्याची घोषणा ठाकरेंनी करताना तेंथे जाहीर सभा घेऊन राम मंदिराबाबत पंतप्रधान मोदींना जाब विचारू, असे म्हटले होते. मात्र जाहीर सभेबाबत शिवसेनेचे दुसरे प्रबळ नेते एकनाथ शिंदे आणि राऊत यांच्यातच वाद झाले. शिंदे यांचा आग्रह सभा घेतली पाहिजे असा होता तर राऊत यांचा सभेला विरोध आहे. शिवाय उत्तर प्रदेश प्रशासनाकडून सभेसाठी परवानगी मिळवण्यातही शिवसेनेला यश आले नाही.
मात्र शिवसेनेने या दौऱ्यासाठी शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली असून निवडक शंभर नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून सेनेचे निवडक पदाधिकारीही जाणार आहेत. शिवसेनेचे आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांवर राज्यातील प्रमुख मंदिरांमधील महाआरतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय हजारो शिवसैनिक विमाने, रेल्वेने जाणार असून सर्व तिकीटे संपली आहेत.