कोकणातील मातब्बर नेत्यासाठी राष्ट्रवादीचे जाळे
मुंबई: कोकणातील एका ज्येष्ठ नेत्याने कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुरू केले असल्याचे वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा मातब्बर नेता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात या नेत्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. त्याच्या जोरावरच राष्ट्रवादी ताकद नसतानाही या मतदारसंघात शिवसेना भाजपला टक्कर देण्याचा मनसुबा करत आहे.
कोकणातील या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद नगण्य आहे. पण या नेत्यासाठी जागा हवी असल्याचे सांगत राष्ट्रवादी या जागेवर दावा करणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीच्या या हालचालींची कुणकुण लागल्यानेच सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसने ही जागा आपल्याकडेच रहावी, असा आग्रह वरिष्ठ नेत्यांकडे धरला आहे. कॉंग्रेसवर अनेक गंभीर आरोप करुन पक्ष सोडलेला नेता मागच्या दाराने महाआघाडीत येणार असल्याच्या शक्यतेने कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
हा मातब्बर नेता राष्ट्रवादीत आल्यास जिल्ह्याची सर्व राजकीय समीकरणे बदलणार आहेत. शिवसेना आणि भाजपपुढे मोठेच आव्हान उभे राहणार आहे. कारण शिवसेनेकडे या नेत्याला आव्हान देईल, अशा ताकदीचा नेता नाही. भाजप तर इथे कमजोरच आहे.