पंकजा मुंडेंनी मध्यप्रदेशातील जनतेचीही जिंकली मने ; सभांना मिळाला मोठा प्रतिसाद

पंकजा मुंडेंनी मध्यप्रदेशातील जनतेचीही जिंकली मने ; सभांना मिळाला मोठा प्रतिसाद

इंदौर : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने मध्यप्रदेशातील जनतेचीही मने जिंकली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेतच्या महू येथील सभेसह अन्य तीन ठिकाणी झालेल्या त्यांच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. मध्यप्रदेश निवडणूकीत भाजप बहुमतासह विजयी होणार असून हा निकाल लोकसभेच्या विजयाची नांदी ठरणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी विविध सभांमधून मतदारांना केले.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे काल शनिवारी मुंबईहून इंदौरला रवाना झाल्या. सकाळी विमानतळावर पोहोचताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर उज्जैन येथे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार डाॅ. मोहन यादव, महू येथे उमेदवार उषा ठाकूर, इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. २ रामनगर येथे रमेश मेंदोला आणि विधानसभा क्षेत्र क्र. ३ शिवाजीनगर भागात आकाश विजयवर्गीय यांच्यासाठी त्यांनी सभा घेतल्या. या सर्व ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. उज्जैन येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर महू येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या समवेत त्यांच्या सभा झाल्या.

पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची उत्कृष्ट कामगिरी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशचा झालेला सर्वांगिण विकास यावर जोर दिला. काॅग्रेस हा मावळतीला आलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे भाजपवर टिका करण्याशिवाय दुसरा कोणताही अजेंडा नसल्याचे त्या म्हणाल्या. मध्यप्रदेशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे, शिवराजसिंह चौहान यांचा विजय कुणीही रोखू शकणार नाही. त्यांच्या शिवराज नावांत शिवाची शक्ती आणि जनतेवर राज करण्याची किमया आहे. जनतेचे सुख त्यांना महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. निवडणुकीत भाजपचे घोषणापत्र नसते तर वचननामा असतो, जनतेला दिलेल्या वचनाची पुर्ती त्यांनी केली आहे. नरेंद्र मोदी हे गरीबांचे जाण असणारे नेते आहेत, त्यांनी गरिबी अनुभवली आहे त्यामुळेच त्यांनी महिलांसाठी उज्ज्वला गॅस सारखी योजना आणली. मध्यप्रदेश सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेचा आदर्श घेवूनच आम्ही महाराष्ट्रात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली. सतत तीन टर्म भाजपचे सरकार असल्याने मध्यप्रदेश आज प्रगत राज्य बनले आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यतच्या अनेक योजना सरकारने यशस्वीपणे राबवल्या आहेत, त्यामुळे भाजप सरकारलाच पुन्हा सत्तेवर बसविण्याची जबाबदारी तुमची आहे त्यासाठी कमळाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने भाजपचे उमेदवार विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

नेत्यांच्या भाषणात मुंडे साहेबांची आठवण

याप्रसंगी प्रचार सभांमध्ये अनेक स्थानिक नेत्यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब प्रत्येक निवडणुकीत मध्यप्रदेशात सभा घ्यायचे त्यांचे या भागातील जनतेशी दृढ नाते निर्माण झाले होते. ते सुध्दा गरिबीतून पुढे आलेले नेते होते. मी त्यांची मुलगी असली तरी त्यांनी मला लहानपणापासूनच सर्व सामान्य लोकांमध्येच वाढवले, त्यामुळे आमची नाळ कायम सामान्य माणसाशी जोडली गेली आहे, आणि हेच भाजपचे संस्कार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मराठवाड्यातील जनतेशी साधला संवाद

इंदौर विधानसभा क्षेत्र क्र. २ व ३ मध्ये मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, नगर,जामखेड आदी भागातील मतदार मोठ्या संख्येने आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे देखील नेहमी याठिकाणी सभा घ्यायचे आता तीच परंपरा पंकजा मुंडेंनी चालवून जनतेशी संवाद साधला. मुंडे साहेब आज हयात नसले तरी गोरगरीबांसाठी त्यांचे पाहिलेले स्वप्न मला पुर्ण करायचे आहे, त्यांचे नांव मी जगाला विसरू देणार नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. भाषणाच्या वेळी या भागातील लहान मुले तसेच तरूणांनी ‘मुंडे साहेब अमर रहे’ चे फलक झळकावून आपल्या नेत्याप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. जनतेच्या या अलोट प्रेमाने पंकजा मुंडे हया देखील भारावून गेल्या.

डाॅ. आंबेडकरांच्या जन्मस्थळी नतमस्तक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मस्थळाला ना. पंकजाताई मुंडे यांनी या दौ-यात भेट देवून अभिवादन केले व प्रचाराला सुरवात केली. याठिकाणच्या स्मारकाची त्यांनी पाहणी केली. स्मारक समितीच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जन्मभूमीला भेट देण्यास आलेल्या नागपूरच्या महिला पंकजाताई यांना पाहताच आनंदित झाल्या व त्यांनी फोटोसेशनही केले.

Previous article…तर सरकार बनणार नाही, पण मंदिर बनेल: उध्दव ठाकरे
Next articleदेवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ सन्मान