देवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ सन्मान

देवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ सन्मान

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘न्यूज २४ या वृत्तवाहिनीकडून ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करतानाच जनसेवेसाठी अधिक कठोर परिश्रम करण्याचे कृतज्ञ अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

न्यूज २४ या प्रसिद्ध वृत्तवाहिनीतर्फे आयोजित ‘जश्न-ए-यंगिस्तान २०१८’ हा पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करुन देशाचे नाव उंचावणाऱ्या तरुण पिढीतील कर्तबगार मान्यवरांना या सोहळ्यात उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले. यंदाचे युवा राजकीय नेतृत्व म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, पुणे येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले.

‘यंग लीडर ऑफ द ईयर’ हा सन्मान प्रदान केल्याबद्दल उपराष्ट्रपती महोदयांसह आयोजक न्यूज २४ या वृत्तवाहिनीचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, या पुरस्कार सोहळ्याला अतिशय समर्पक नाव देण्यात आले आहे. कारण सध्या जगाचा विचार करता सर्वाधिक तरुणांची संख्या भारतात आहे. देशातील नागरिकांचे सरासरी वय या निकषानुसार विचार केला तर २०२० मध्ये जपानचे सरासरी वय ४८, पूर्व युरोपचे ४४, पश्चिम युरोपचे ४१, अमेरिकेचे ३९ आणि चीनचे ३७ असेल, मात्र त्याचवेळी भारतातील नागरिकांचे सरासरी वय हे २९ वर्ष असेल. म्हणजेच जगातील सर्वाधिक युवा शक्ती भारतात सामावलेली असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने अग्रेसर होत आहे. विश्वाचा मार्गदर्शक म्हणून भारताला महत्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी हीच युवा शक्ती निर्णायक भूमिका बजावणार आहे. या पार्श्वभूमीवर युवा शक्तीचा हा महोत्सव आयोजित करुन सन्मानासाठी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संयोजकांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच हा सन्मान सार्थ ठरविणारे कार्य मी भविष्यात करत राहणार आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी अखेरीस दिली आहे.

Previous articleपंकजा मुंडेंनी मध्यप्रदेशातील जनतेचीही जिंकली मने ; सभांना मिळाला मोठा प्रतिसाद
Next articleमी पवारांना कमळाचा बुके दिलाय : उदयनराजे भोसले