मी पवारांना कमळाचा बुके दिलाय : उदयनराजे भोसले

मी पवारांना कमळाचा बुके दिलाय : उदयनराजे भोसले

सातारा: मी हातावर घड्याळ बांधलंय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कमळाचा बुके दिलाय, असे सूचक वक्तव्य करत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात आले असताना उदयनराजे भोसले यांनी एका हॉटेलमध्ये त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसलेंना तुमचे छायाचित्र महाराष्ट्र क्रांती पक्ष वापरतो. मग तुम्ही भाजपतर्फे निवडणूक लढवणार का, असे विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले की, माझा घसा बसल्यामुळे मी काही बोलू शकत नाही. पण ते जर माझा फोटो वापरत असतील तर चांगलंच आहे. उदयनराजे भोसले यांच्या या सूचक विधानावरून त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप काही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आली की राम मंदिराचा मुद्दा कसा निघतो, असा सवाल त्यांनी केला.

उदयनराजे भोसले यांना यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेस लोकसभा उमेदवारी देणार का, अशी चर्चा रंगत आहे. उदयनराजे भोसले यांना पुन्हा उमेदवारी देण्यास जिल्ह्यातीलच काहींचा विरोध आहे. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यात विळ्याभोपळ्याचं सख्य आहे. शरद पवार यांच्याकडे दोन्ही गटांनी परस्परांविरोधात तक्रारीही केल्या आहेत. आता उदयनराजे यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय पवारांवरच अवलंबून असला तरीही तिकीट दिले नाही तर आपल्याकडे भाजपचा पर्याय आहे, हेही उदयनराजे भोसले यांनी पवारांना सुचवले आहे. शिवेंद्रराजे भोसले हेही उदयनराजे यांच्या विरोधात आहेत. या अंतर्गत संघर्षावर तोडगा काढणे ही पवारांसाठीही कसोटीच आहे, असे बोलले जाते.

Previous articleदेवेंद्र फडणवीस यांना ‘यंग लीडर ऑफ द ईयर’ सन्मान
Next articleसरकारचे अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा :जयंत पाटील