सरकारचे अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा :जयंत पाटील 

सरकारचे अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा :जयंत पाटील 

सातारा: केंद्र आणि राज्यातील भाजप शिवसेना सरकारचे अपयश झाकण्यासाठी आता त्यांना राम मंदिराचा मुद्दा सुचत आहे, असा हल्ला राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चढवला. राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावरच राम मंदिर बांधायचे की नाही आणि ते कुठे बांधायचे, हे ठरणार आहे. मग उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला.

निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा त्यांना ठळक करायचा आहे. भाजपच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी अयोध्येत भाषण केले. यामुळे फक्त शिवसेनेची मतं उत्तर प्रदेशात वाढतील, असे जयंत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना रामाचे आशिर्वाद मिळतील, या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. मुख्यमंत्री फडणवीसांनी अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देणे हे एक ढोंग आहे. मुख्यमंत्री वेळ मारुन नेण्यात तरबेज आहेत. उद्धव म्हणताहेत त्याप्रमाणे राम जर तुरुंगात आहे तर त्यांचे आशिर्वाद उद्धव यांना कसे मिळतील, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. उद्धव यांच्या दौऱ्याचा केंद्र आणि राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. उद्धव यांना दौरा करायचा होता तर त्यांनी अगोदर सरकारमधून बाहेर पडायला हवे होते, अशी बोचरी टीका पाटील यांनी केली.

Previous articleमी पवारांना कमळाचा बुके दिलाय : उदयनराजे भोसले
Next articleशिवसेनेचे राजीनामे कागदी होड्या करून शरयूत प्रवाहित!: विखे पाटील