भाजप सत्तेसाठी रामाच्या नावाने अशांतता निर्माण करतेय : नवाब मलिक

भाजप सत्तेसाठी रामाच्या नावाने अशांतता निर्माण करतेय : नवाब मलिक

 मुंबई : प्रभू रामाने शांततेसाठी सत्ता सोडून १४ वर्षाचा वनवास स्वीकारला आणि भाजप सत्तेसाठी रामाच्या नावाने अशांतता निर्माण करत असल्याचा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मानखुर्द येथील युवक कार्यकर्ता मेळाव्यात केला.

संविधान बदलून भाजप मनुवादी व्यवस्था आणण्याचे काम करत असून याविरोधात देशातील तरुण एकवटला आहे आणि येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाची बिदाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला. 

 संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसवतीने ‘भाजप हटाव…भारत बचाव’… या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर ते बोलत होते. नवाब मलिक यांनी आपल्या एक तासाच्या भाषणामध्ये तरुणांच्या मनात जोश भरलाच शिवाय भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला. भाजप सरकारने कशापध्दतीने देशातील जनतेची फसवणूक केली आहे याची इत्यंभूत माहिती जनतेसमोर ठेवली.

 अच्छे दिनाची आश्वासने, तरुणांना रोजगाराची दाखवलेली प्रलोभने, मुद्रा लोन, काळा पैसा, जनधन योजना, नोटबंदीने सर्वसामान्य लोकांच्या घरात निर्माण झालेली परिस्थिती याबाबत भाष्य करतानाच मोदींवर शरसंधान साधले.

 मोदींच्याविरोधात आम्ही नाही तर या देशातील तरुण विरोधात लढणार असून सरकारकडे सहा महिन्याचा कालावधी आहे. सहा महिन्यानंतर मोदींचे सरकार बेदखल होणार ही काळया दगडावरील रेष असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

 या सभेत मुंबई युवकचे अध्यक्ष निलेश भोसले यांनीही आपले विचार मांडले. युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील यांनी अवसानघातकी काम करणाऱ्या भाजपाच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन उभारले असून हा लढा आपल्याला आणखी तीव्र करावयाचे असल्याचे आवाहन केले.

 चार वर्षात भाजपाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारता आले नाही ते मुंबई शहराचा काय विकास करणार असा टोला मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी यावेळी लगावला.

Previous articleनितेश राणेंनी आम्हाला शहाणपण शिकवू नये : विनायक मेटे
Next articleनारायण राणेंना महाआघाडीत स्थान अशक्य: हुसेन दलवाई