मंत्र्यांनो…लोकांची कामं करा नाही तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही

मंत्र्यांनो…लोकांची कामं करा नाही तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही

मुंबई :  कर्जमाफी केली असे सरकार सांगत आहे परंतु शेतकरी आत्महत्या करायचे थांबत नाहीत.सरकारला जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे अशा शब्दात राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावत मंत्री फक्त चांगले कपडे घालून वावरतात, काळजी घ्या लोकांची कामे करा नाही तर पुढच्या वेळी लोक हे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यांनी दिला.

दुष्काळाच्या चर्चेवर बोलताना अजित पवार यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयी असलेल्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार प्रहार केला. अजितदादा पवार यांनी अनेक मुद्यांना हात घातला आणि सरकारच्याकारभाराचे अक्षरश:वाभाडे काढले.नोटबंदीचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम झाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. त्या नोटाबंदीने सर्वांचं वाटोळं केलं आहे. मंत्री फक्त नोट लिहून काढतात पण शेतकऱ्यांना काही देत नाही. शेतकऱ्यांना द्या अशी मागणी  पवार यांनी केली.

काल दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात सांगितले होते की, ऐतिहासिक कर्जमाफी केली. तुम्ही लोकांमध्ये फिरा म्हणजे तुम्हाला कळेल किती लोकांना कर्जमाफी मिळाली ती आणि मग सरकारने आकडे जाहीर करावेत आणि किती लोकांना कर्जमाफी मिळाली ते सांगावे असे थेट आव्हान  पवार यांनी सरकारला दिले.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा द्या अशी मागणी करतानाच इकडे शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रश्न असताना काही जण राम मंदिराचा मुद्दा काढत आहे.राम बाहेर आला की समजा निवडणूक आली असा टोला शिवसेनेचे नाव न घेता  पवार यांनी लगावला.उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीची माती अयोध्येला नेली. शिवनेरी आणि अयोध्येचा काय संबंध ? असा सवाल करतानाच शिवसेनेची सध्या ‘अवणी’ झाली आहे. भाजपवाले रोज तिच्यावर गोळ्या झाडत आहेत अशा शब्दात  पवार यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.सरकारने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांबाबत निर्णय घ्यावा.राज्यभरातील अनेक धरणांची दुरावस्था झाली आहे. आज नोव्हेंबर महिना सुरू आहे मात्र आजच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. यावर राज्य सरकार काहीच करत नाही. मुख्यमंत्र्यांना काहीही विचारले तर म्हणतात अभ्यास करत आहोत. मंत्र्यांना विचारलं तर म्हणतात अभ्यास करतोय. शाळेत यांनी एवढा अभ्यास केला नाही का असा टोला लगावतानाच मंत्री फक्त चांगले कपडे घालून वावरतात काळजी घ्या लोकांची कामे करा नाहीतर पुढच्या वेळी लोक हे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यांनी दिला.

दुग्ध व्यवसायाची परिस्थिती वाईट आहे. सरकारने अनुदान जाहीर करावे अशी मागणी करतानाच शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना पाच लाखाची मदत द्या.तसा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्या असे सांगतानाच शिवसेनेने धाडस दाखवायला हवं. सरकार राहीलं नाही तर जाईल परंतु शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी असेही पवार म्हणाले.सरकारने जाहीर केलेली कृषीपंप जोडणीची आकडेवारी बोगस आहे. शेतकरी स्वतःचे सरण रचून आत्महत्या करत असताना सरकारला झोप कशी लागते ? असा थेट सवाल सरकारला केला.फळबागांना १ लाख रुपये आणि इतर पिकांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्या मागेल त्याला काम द्या मागेल त्याला टँकर द्या मनरेगा चालू ठेवा. शेतकऱ्यांना उठून उभे राहण्यासाठी मदत करा असे आवाहन  पवार यांनी सरकारला केले.दुष्काळावर बोलताना  पवार यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा थेट सवाल केला. पाणी नाही. जनावरांना चारा नाही. ग्रामीण भागात  परिस्थिती भयानक आहे. पुढची दोन वर्षे पाऊस पडणार नाही. पीक विमा शेतकऱ्यांचं नव्हे तर कंपन्यांचं भलं करायला सुरु केल्याचा आरोप  पवार यांनी केला.सरकारच्या जलयुक्त शिवाराचा बट्ट्याबोळ झालाय. टँकर वाढले आहेत.त्यामुळे या जलयुक्त शिवाराची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणीही  पवार यांनी केली.

 

 

Previous articleमराठा आरक्षण देण्याबाबत सरकारच्या मनात पाप : धनंजय मुंडे
Next articleसांगा, कायद्यात कुठे अहवाल मांडण्यास मनाई आहे ? :  विखे पाटील