मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन
मुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृट्या मागास प्रवर्गातून आरक्षण मंजूर करणारा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावर कृतज्ञ उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाच्या यशस्वी आणि सामंजस्यपूर्ण सोडवणूकीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचे आभार मानले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर कार्यवाही करतांना आज राज्य सरकारने सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल टाकले. त्यानंतर सायंकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव मांडला. ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या पन्नास वर्षापासून करण्यात येत आहे. विशेषत: गेल्या काही दिवसात या प्रश्नावर जनभावना तीव्र असतांना मुख्यमंत्र्यांनी अतिशय सामंजस्याने व मुत्सद्देगिरीने सर्व समाजघटकांना विश्वासात घेवून आरक्षणाच्या मागणी वरुन निर्माण झालेला पेच सोडवला. विशेष म्हणजे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे एकमत तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन करीत आहे. या ठरावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अनुमोदन दिले. परिवहन मंत्री दिवाकर रावते, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्र्यांचा गौरव केला. अत्यंत संवेदनशील झालेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर संयम आणि समन्वयाने तोडगा काढून महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात अभूतपूर्व मतैक्य घडवून आणल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला उत्तर देतांना राज्य मंत्रिमंडळाने या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी प्रयत्न करीत असतांना दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. विशेषत: या संदर्भात स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने दिलेल्या योगदानाचा त्यांनी कृतज्ञ शब्दात उल्लेख केला.