सरकारची कथनी एक आणि करणी वेगळी : भुजबळ

सरकारची कथनी एक आणि करणी वेगळी : भुजबळ

 मुंबई : भाजप सरकार बोलते खूप आणि करत काही नाही म्हणजे या सरकारची कथनी एक आणि करणी वेगळी आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी केली.

 अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये काही वर्तमान पत्रातील बातम्यांचा संदर्भ देत अनेक योजनांमध्ये सरकार कसे फेल ठरले आहे हे दाखवून दिले.

भाजप सरकारच्या अनेक फसव्या योजना आणि राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यस्था मेक इन महाराष्ट्रातील गायब उद्योग आणि रोजगार यासह अनेक मुद्दयांना हात घालत आमदार छगन भुजबळ यांनी भाजप सरकार आणि  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. दहा स्मार्ट सिटी करणार होता ना मग एक तरी करायची होती ना करता येत नाहीतर पडता कशाला त्यामध्ये अशी विचारणाही आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला केली.या चार वर्षात राज्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज वाढले. बेरोजगारी वाढली,नोकऱ्या काही दिल्या नाही. लोकांवर समृध्दी महामार्ग लादला. बुलेट ट्रेन असे जाचक प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. ओबीसी,मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून या सरकारने राज्य दिवाळखोरीकडे ढकलले आहे असा आरोप भुजबळ यांनी केला.

 याआधीच्या युती सरकारने भरमसाठ कर्ज राज्यावर केलं त्यानंतर आघाडी सरकार आल्यावर विकास केला आणि १५ वर्षात २ लाख कोटीचं खर्च ठेवलं. आताच्या सरकारने आतापर्यंत ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज केले आहे. यावेळी सरकारने जे तीन लाख कोटींचं बजेट दिलं. या अधिवेशनात २० हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. हिवाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. एकूण ३१ हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी मान्य केली. याचा अर्थ राज्याची अर्थस्थिती कोलमडली आहे मात्र सरकार त्यावर काहीही कार्यवाही करत नाही असाही आरोप भुजबळ यांनी केला.

 राज्याचा महसूल कमी झाला आहे. महसूली खर्चासाठी कर्जाची रक्कम वापरली जात आहे. बुलेट ट्रेनसाठी जपानकडून १ लाख कोटींचं कर्ज घेतलं. समृध्दी महामार्गासाठी दक्षिण कोरियाकडून कर्ज घेतले. रुण काढून सण साजरी करण्याचं काम राज्यसरकार करत असल्याचा टोला भुजबळ यांनी लगावला.राज्यात पाण्याची परिस्थिती वाईट असताना महाराष्ट्राचे पाणी दुसरीकडे दिले जात आहे. दमन गंगा,नार-पार या धरणाचे पाणी गुजरातकडे पाठवले जात आहे. आज मराठवाडयात पाणी नाही. जिल्हया जिल्ह्यात पाण्याची चणचण भासत आहे. गुजरातमधले धरणे भरण्यासाठी मदत केली जात आहे आणि महाराष्ट्रात दुष्काळ असताना पाणी तिकडे जात आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारला माफ करणार नाही असा इशाराही भुजबळ यांनी दिला.

 परदेशातील गुंतवणूक घसरली आहे. महाराष्ट्र ३ नंबरला आला आहे. कर्नाटक, गुजरात पुढे जात आहे.  महाराष्ट्रात फक्त ३८ हजार कोटीचे प्रस्ताव आले आहेत. स्टँड अप इंडिया फ्लॉप ठरली आहे. सरकारने सांगितले होते की १ कोटी उद्योगासाठी देण्यात येतील मात्र प्रत्यक्षात दिले फक्त १६ लाख ८८ हजार रुपये. सरकारने नोटाबंदी करून देशातील जनतेचं वाटोळं केलं. दहशतवाद संपणार असे म्हटले होते कुठे झाला दहशतवाद कमी ? असा संतप्त सवाल आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला केला.

 कांद्याला एक रूपया दोन रुपयांचा भाव मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले होते तेव्हा त्यांनी मोठमोठया वल्गना केल्या. कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. कुठे गेला वादा ?लोकांचा इथे वांदा होवून बसला अशी मिश्किलीही भुजबळ यांनी केली.

 सरकारने एकही फोर लेन रस्ता बनवला नाही. टोलमुक्त महाराष्ट्रही यांनी केला नाही. यांना स्टेट लेवल हायवे बनवता आला नाही म्हणून तर त्याला नॅशनल लेवलला देवून टाकला. तिथे टोलशिवाय पर्याय नाही. अनेक रोडची परिस्थिती फार बेकार आहे. लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ७२ लाख नोकऱ्या देणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे म्हणून भरती करत नाही असे सांगण्यात येत होते. आता आरक्षणाचा प्रश्न सुटला आहे सरकारने तात्काळ भरत्या सुरू कराव्यात अशी मागणी भुजबळ यांनी केली.

 कौशल्य विकास योजनेचा बोजवारा उडाला आहे. संस्था सर्व बुडल्या आहेत. लोक त्या संस्थांमध्ये कामाला लागले होते त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पारनेर येथे दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले. पोलिसांचा दरारा राहिला नाही. सत्तेतील लोक अग्रलेख लिहीत आहे की, पोलीस मार खात आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केला जात आहे. सामनातून एकमेकांची ऊणीधुणी काढली जात आहे असेही भुजबळ म्हणाले.

 सनातन संस्थेचे राज्य आले असं भासत आहे. कोणाचेही खुन केले जात आहेत त्यांना रोखणारे कोणीही नाही.साधकांच्या घरात स्फोटकं सापडत आहेत. सरकार मेक इन इंडिया म्हणतं हे काय बॉम्ब बनवायला आहे का ? असा सवालही  भुजबळ यांनी केला.हे लोक अंधश्रद्धा पसरवत आहे. माझ्या शेतातील आंबे खा तुम्हाला मुलं होतील अशी अंधश्रद्धा बोलून दाखवली जात आहे. त्यांना मोकाट सोडले जात आहे. तरुण तडफदार मुख्यमंत्र्यांचं हे राज्य आहे असं राज्य चाललं तर कसं चालेल ? असा रोखठोक सवालही  भुजबळ यांनी केला.

 गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु त्यामध्ये फक्त खुल्या प्रवर्गातील विदयार्थ्यांनाच शिक्षणासाठी परदेशी पाठवले गेले. मग सरकार असा भेदभाव का करत आहे असा सवालही  भुजबळ यांनी केला.

Previous article“आरक्षणाचं श्रेय केवळ मराठा समाजालाच”सरकारने अधिवेशनात पळपुटेपणा केला : मुंडे
Next articleराष्ट्रवादीत जाण्याच्या वावड्याच : नारायण राणे यांचा खुलासा