राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात काय बोलणार?

राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात काय बोलणार?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या रविवारी कांदिवलीतील उत्तर भारतीयांच्या महापंचायतला संबोधित करणार आहेत. नेहमीच परप्रांतियांविरोधात भूमिका घेणारे राज ठाकरे त्यांच्या मंचावर जाऊन काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. शिवसेनेपाठोपाठ मनसेने बदललेल्या भूमिकेमागे उत्तर भारतीयांना मनसेकडे वळवण्याचा हेतू असल्याची चर्चा आहे.

महापंचायतचे विनय दुबे यांनी राज ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे आणि राज यांनी ते स्वीकारल्यावर मोठाच राजकीय गदारोळ झाला होता. मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी तर राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणीही केली होती.उद्या रविवार सायंकाळी भुराभाई हॉल, इराणीवाडी, कांदिवली पश्चिम येथे होणा-या उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमास राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ते या मंचावर जाऊन काय बोलणार याबाबत तर्कवितर्क सुरू असताना उत्तर भारतीयांनी मात्र राज ठाकरेंना विचारण्यासाठी काही प्रश्न तयार केले असल्याचे समजते.

घटनेनुसार प्रत्येकाला कुठेही जाऊन रोजगार मिळवण्याचा अधिकार असताना तुम्ही आम्हाला बेदम मारहाण का करता?, घटना तुम्हाला मान्य नाही का?, कल्याण येथे रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर  भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करून पिटाळून लावले. तुमचे कार्यकर्ते फक्त परप्रांतीय फेरिवाल्यांना जोरदार मारहाण करतात. त्यांना तेथे बसवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना तुम्ही का हात लावत नाहीत? असे राज ठाकरेंना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. याला राज ठाकरे कशी उत्तरे देतात, यावरून मनसेच्या आगामी धोरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.

Previous articleगुड न्यूज : १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार
Next articleमराठा आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील एका व्यक्तिला एसटीमध्ये नोकरी