किती काळ लाचारसारखं जगणार ; उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी ठणकावलं

किती काळ लाचारसारखं जगणार ; उत्तर भारतीयांना राज ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई: महाराष्ट्रात मराठी युवकांनाच नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नोकऱ्या जर परप्रांतिय हिसकावून घेत असतील तर त्यास मनसे विरोध करेलच,असे सांगतानाच उत्तर प्रदेश बिहार मध्ये रोजगार आले नाहीत.त्याला तिथले राजकारणी जबाबदार आहेत याचा जाब त्यांना विचारायला हवा. किती काळ तुम्ही असे लाचार सारखे जगणार अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना आज ठणकावले.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या कांदिवलीमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात ठणकावले. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर काय बोलणार, याची संपूर्ण राज्यात उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी यावेळी रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतियांना मारहाण, फेरिवाल्यांना दमदाटी, रोजगारांच्या संधी वगैरे अनेक मुद्यांवर भूमिका सांगताना उत्तर भारतीयांची कान उघाडणीही केली.
राज ठाकरे यांनी प्रथमच हिंदी भाषेतून आपले विचार मांडले. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतून लाखो लोक मुंबईत येतात. कुणालाही कुठेही काम करायचा अधिकार घटनेने दिला आहे, असा एक गैरसमज पसरवला जातो. पण तसे नाही, तर ज्या राज्यात जातो तेथील पोलिसांना सर्व माहिती द्यावी लागते. पण हा इंटर मायग्रेशन अॅक्ट कुणी नीट वाचलेलाच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

उत्तर भारतीयांना कानपिचक्या देताना राज ठाकरे यांनी सांगितले की, तुमच्या राज्यातील लोक इथल्या माता भगिनींना वाईट बोलत असतील तर कसे सहन करणार? त्यांच्या सुरक्षेबाबत मनसे तडजोड करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. रेल्वे भरतीच्या जाहिराती फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमधील वृत्तपत्रात देण्यात आल्या. परप्रांतीय उमेदवार हजारोंच्या संख्येने आले आणि आमच्या कार्यकर्त्यांनी विचारले तर जी भाषा वापरली ती अत्यंत असभ्य होती. अशी भाषा वापरल्यावर आमचे लोक काय हातावर हात धरून बसतील काय, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.

प्रत्येक राज्यात स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, ही भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांचा विकास तेथील नेते का करत नाहीत आणि तुम्ही त्याबद्दल त्यांना जाब का विचारत नाहीत, असा सवाल केला. तुमचा स्वाभिमान कुठे आहे, असा सवाल केला. रोज त्या राज्यांतून ४८ गाड्या भरून येतात आणि रिकाम्या जातात. त्या राज्यात उद्योग गेले तर तेथील नोकऱ्यांत तिथल्या स्थानिकांनाच प्राधान्य दिले पाहिजे.

मी परप्रांतियांविरोघात बोललो की माध्यमे तेच धरून बसतात पण बाकीचे लोक बिहारींबद्दल बोलले की त्यावर फारशी चर्चाही होत नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, हे चुकीचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. कारण तसा निर्णय झालेलाच नाही. मात्र हिंदी भाषा खूप सुंदर आहे, असेही ते म्हणाले.

Previous articleशिर्डी संस्थानकडून सरकारला बिनव्याजी पाचशे कोटीचे कर्ज
Next articleएस.सी-एस.टी उद्योजक विकास परिषदेचे आज उद्योगमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन