दुपारी युतीचा नगारा सायंकाळी स्वबळाचा नारा !

  1. दुपारी युतीचा नगारा सायंकाळी स्वबळाचा नारा !

मुंबई: वाशिम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा नगारा वाजवला. एकमेकांवर कौतुकाची फुलंही उधळली. सायंकाळी मात्र उद्धव ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा देत आपल्या मंत्र्यांना अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले. त्यामुळे युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सायंकाळी विरूनही गेली.

वाशिम येथील कार्यक्रमात फडणवीसांनी ठाकरे आमचे मार्गदर्शक असल्याचं सांगितलं. तर उद्धव यांनीही त्यांचं कौतुक केलं. सायंकाळी मात्र उद्धव यांनी मातोश्रीवर मंत्र्यांची बैठक बोलवून त्यांना भाजपविरोधात अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले.उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दुष्काळी भागात जाऊन तिथे मदत पोहचते आहे की नाही, ते पाहण्यास सांगितले आहे. निवडणूक जवळ येत असल्यानं अधिक आक्रमक होतानाच स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नाराही उद्धव यांनी दिल्याचंही बोललं जातं.

वाशिममधील कार्यक्रमानंतर युती होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. त्यामुळे भाजप वर्तुळात समाधान व्यक्त केले जात होते. सायंकाळी मात्र भाजपच्या मनसुब्यांवर पाणी पडले. त्यामुळे पुन्हा युती होणार की नाही ही चर्चा रंगत आहे.

Previous articleमहाराष्ट्रात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणूक?
Next articleआरक्षण टिकवण्याची लढाई आता सुरू:चंद्रकांत पाटील