धार्मिक उन्मादातून मतांच्या ध्रुवीकरणाचा रक्तरंजित पॅटर्न पुन्हा राबवण्याचा प्रयत्न? : उद्धव ठाकरे 

धार्मिक उन्मादातून मतांच्या ध्रुवीकरणाचा रक्तरंजित पॅटर्न पुन्हा राबवण्याचा प्रयत्न? : उद्धव ठाकरे 

मुंबई: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे गोहत्येच्या संशयावरून उफाळलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला जोरदार लक्ष्य केले आहे. धार्मिक उन्माद आणि मतांच्या ध्रुवीकरणातून तोच रक्तरंजित पॅटर्न भाजपला राबवायचा आहे का, असा सवाल त्यांनी सामना संपादकीयातून केला आहे. यावरून मध्यंतरी निवळत चाललेला सेना भाजपमधील तणाव तसाच आहे, हे समोर आले आहे.

उध्दव ठाकरे यांनी संपादकीयात भाजपवर कठोर टीका केली आहे. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत ज्या निर्णायक आहेत. त्यामुळे गोहत्येचे संशयपिशाच्च लोकांच्या मानगुटीवर बसवून धार्मिक उन्माद आणि मतांच्या ध्रुवीकरणातून रक्तरंजित पॅटर्न पुन्हा राबवला जात आहे का, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

उत्तरप्रदेशातील ७१ जागा जिंकल्यानेच २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे बहुमताचे सरकार येऊ शकले. आता तसे तर काही होणार नाही. विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे कैराना पोटनिवडणुकीने दाखवूनच दिले आहे. मुजफ्फरनगर आणि कैराना घडवून आणले तसे बुलंद शहर घडवून आणले जात आहे का, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी सामनात व्यक्त केली आहे.शेवटी प्रश्न लोकसभेच्या ८० जागांचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी कान उपटूनही गोरक्षकांचा उन्माद कमी झालेला नाही. गोरक्षणाच्या आडून धार्मिक ध्रुवीकरण घडवून मतांच्या पोळ्या भाजून घेणारे नामानिराळे राहतात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संपादकीयातून भाजपवर केली आहे.

Previous articleलाख’मोलाची बाळासाहेब ठाकरे स्मृती एकांकिका स्पर्धा ११ ते २० जानेवारी रोजी ठाण्यात
Next articleअस्तित्व टिकवण्यासाठी राज ठाकरेंकडून माझ्या नावाचा वापर:ओवेसी