शहरांच्या नामांतरांपेक्षा अयोध्येत राममंदिर होणे महत्वाचे: उद्धव ठाकरे 

शहरांच्या नामांतरांपेक्षा अयोध्येत राममंदिर होणे महत्वाचे: उद्धव ठाकरे 

मुंबई: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी जेथे जातात तेथे त्या शहराचे नामांतर करण्याच्या घोषणा करत आहेत. पण अयोध्येत राम मंदिर होणे जास्त महत्वाचे आहे. रामाचा वनवास संपून रामाचे भाग्य कधी फळेल ते अगोदर सांगा, या शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयातून भाजपला ठणकावले आहे. योगींची एक सभा मराठवाड्यात लावा, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर होऊन जाईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

योगी भगवे वस्त्रधारी असल्याने त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. हैदराबादचे भाग्यनगर करू, ओवेसी बंधुंना हाकलून देऊ असे ते म्हणतात. तेलंगणात निजामाच्या खुणा आहेत आणि ओवेसी तर निजामाचे वंशजच असल्यासारखे वागतात. निजामाची वळवळ पटेलांचा उंच पुतळा उभारणाऱ्यांनी थांबवायला हवी, असे उद्धव ठाकरे यांनी संपादकीयात म्हटले आहे.

ओवेसीना हाताशी धरून देशात जातीय दंगली घडवण्याचा कट रचल्याची पिचकारी मुंबईतील एका राजकीय नेत्याने मारली, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मारला. परंतु ओवेसी भाजपची बटीक असल्याचा आरोप इतरही विरोधी पक्ष करत असतात. ओवेसी बंधुंचे राजकारण भाजपला फलदायी ठरते असे आक्षेप घेतले जातातच.
ओवेसींबरोबर प्रकाश आंबेडकर असल्याने याचा फायदा भाजपला कसा होणार आहे अशी गणिते मांडली जात असल्याने हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या योगी यांच्या भूमिकेस महत्व आहे. पण निजाम-बाबराच्या खुणा देशभरात आहेत. आमच्या मराठवाड्याने निजामाचा अत्याचार सोसला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव कधी होणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

राजा कालस्य कारणम् याप्रमाणे प्रत्येक गोष्टीस राजा जबाबदार असतो. योगी मोगलाईच्या खुणा पुसण्यासाठी शहरांची नावे बदलत आहेत. परंतु मूळ प्रश्न सोडवण्यास ते तयार नाहीत. त्यांच्यापुढे इतिहासाची प्रश्नपत्रिका असून ते भूगोलाची उत्तरे देत आहेत, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले आहे.

Previous articleराज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न
Next articleसंभाजी भिडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीने खळबळ