जवान आणि किसान यांना वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते प्रचारात मग्न:उद्धव ठाकरे 

जवान आणि किसान यांना वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते प्रचारात मग्न:उद्धव ठाकरे 

मुंबई:महाराष्ट्र राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत आहे. पण राज्यकर्ते मात्र निवडणुकांच्या प्रचारात गुंतले आहेत. मुख्यमंत्री धुळे महापालिका निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत तर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे धुळ्यातच मुक्कामी आहेत. इतर मंत्र्यांनाही धुळ्याचे प्रभाग नेमून दिले आहेत. म्हणजे जवान आणि किसान या दोघांनाही वाऱ्यावर सोडून राज्यकर्ते प्रचारातच आहेत. शेतकरी मरणपंथाला लागला तरी प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे, अशी घणाघाती टीका सामना संपादकीयामधून आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.

संपादकीयात ठाकरे यांनी जोरदार तोफा डागताना म्हटले आहे की, आता मदत मिळाली नाही तर आम्ही सगळेच आत्महत्या करू, असे शेतकऱ्यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर सांगितले. राज्याचा शेतकरी आक्रोश करत आहे. शेतकरी संतापला तर आहेच पण त्याचू जगण्याची इच्छा मेली आहे तशी लढण्याची जिद्दही संपली आहे, असे शब्दांचे कडवे घोट उद्धव ठाकरे यांनी सरकारला पाजले आहेत.
शेतकऱ्याने इतके लढे देऊनही हाती काहीच लागले नाही. फडणवीस सरकारने प्रचंड घोषणाबाजी केली पण शेतकरी मरणपंथाला लागला आहे. केंद्रीय पथकालाही बॉडीगार्ड घेऊन फिरावे लागले. ज्या वाटेवरून सरकार आले त्या वाटेवर आता सुरूंग पेरले असल्याची वस्तुस्थिती संपादकीयातून दाखवली आहे.करमाळ्यातील जातेगावचा शेतकऱी किसन वारेची व्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याची व्यथा आहे. अधिकारी येऊन फक्त पाहणी करून जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सरकारवर सत्तेत राहूनही सतत टीका करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या त्या समजून घेतल्या पाहिजेत. या पथकाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. किसन वारे सारखे शेतकरी शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत. जगायचे कसे, हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतात राबून अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करत पीक काढल्यावर त्याला कवडीमोल भावाने विकण्याशिवाय शेतकऱ्यासमोर पर्यायही राहत नाही, असे वास्तव संपादकीयात उद्धव ठाकरे यांनी दाखवले आहे.
संजय साठे या शेतकऱ्याने कांद्याचे पैसे पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. राज्यातील शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ नये म्हणून केंद्रीय पथकालाही बंदोबस्त देण्यात आला. याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये संताप आहे याची खात्री सरकारलाही आहे. जेथे सरकार चालवण्यासाठी शिर्डी संस्थानकडून कर्ज घ्यावे लागते ते सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न काय सोडवणार, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Previous articleशरद पवारांचा वाढदिवस साजरा न करता दुष्काळग्रस्तांना मदत द्या- जयंत पाटील
Next articleसरकारला प्रशासनाकडून काम करूनच घेता येत नाही : अजित पवार