भाजपचे २८ उमेदवार अट्टल गुन्हेगार ;मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला : आ.गोटे

भाजपचे २८ उमेदवार अट्टल गुन्हेगार ;मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला : आ.गोटे

धुळे:धुळे महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच पानी खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपने तब्बल २८ अट्टल गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

गोटे यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत धुळ्यात मला पर्याय शोधत आहात, असे समजल्यावरून मी विचारणा केली होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तत्क्षणी इन्कार केला होता. तरीही पालकमंत्री गिरीश महाजन यांची पालिका निवडणुकीसाठी नियुक्ती करताना आपल्याला एकाही शब्दाची कल्पना दिली नाही, असे गोटे यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे लिहीले आहे की, १७ नोव्हेंबरच्या बैठकीतही निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली होतील. तीन मंत्री माझ्याबरोबर राहतील, असे सांगितले होते. चोवीस तासात या आश्वासनाला हरताळ फासण्यात आला. तीनही निर्णय फिरवण्यात आले.

१९ नोव्हेंबरला मी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते की, माझ्या पत्नीबद्दल बिभत्स मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या समाजकंटकास प्रदेशाध्यक्षांनी पक्षात घ्यावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पक्षनेतृत्वाला अंधारात ठेवून स्थानिक नेत्यांनी हे केले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आता असे करणे योग्य ठरणार नाही. निवडणूक झाल्यावर कार्यकारिणी बरखास्त करतो, असे म्हटले होते. परंतु आता कार्यकारिणी राहिली काय किंवा गेली काय, आपल्याला फरक पडत नाही, असे गोटे यांनी म्हटले आहे.

सोमवारी १९ नोव्हेंबरच्या बैठकीबाबत गोटे यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत ठरल्यानुसारच उमेदवारांबाबत निर्णय होईल, असे सांगितले होते. त्यांनी मागितल्यावर मी उमेदवारांची यादी ताबडतोब दिली. मात्र मी गेल्यावर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि अनुप अग्रवाल दानवे यांना भेटून गेल्याचे समजले. परंतु त्यांनी संभाव्य उमेदवारांची यादी आणली नव्हती.

भाजपने धुळ्यात ज्या ६२ उमेदवारांना तिकीट दिले त्यापैकी ५७ जण आयात माल आहेत, असा आरोप गोटे यांनी केला आहे. त्यापैकी २८ जण अट्टल गुन्हेगार आहेत. प्रवीण अग्रवालवर तर बलात्काराचा गुन्हा आहे, असे गोटे यांनी लिहीले आहे. फडणवीस यांनीच आपला विश्वासघात केल्याचे कारस्थान रचल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी या खुल्या पत्रात केला.

Previous articleसहा महिन्यात काँग्रेसचे सरकार, जनतेला दिलासा मिळणारः खा. चव्हाण
Next articleतर माझ्या घरची पाच जनावरे मुख्यमंत्र्यांच्या घरी नेऊन सोडेल : मुंडे