गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतच असतात : आंबेडकर
मुंबई : गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात, अशी खोचक टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर केली आहे.
अंबरनाथ येथिल कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर झालेल्या धक्काबुक्की मागे कोणतेही षडयंत्र असल्याचे मला वाटत नाही. असे सांगतानाच
माझ्यावर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कुणाचे हात आहेत. त्याने माझ्यावर हल्ला का केला? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवलेंनी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंवर खोचक टीका केली आहे. गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात असा टोला त्यांनी लगावला आहे.
आठवले यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली आहे.हल्लाखोरावर कठोर कारवाई केली जावी व या मागे नेमके कोणाचे हात आहेत. याचा शोध पोलिस यंत्रणेने लावणे आवश्यक आहे.हा हल्ला आठवलेंवर नसून संपूर्ण रिपब्लिकन चळवळीवर आहे. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा जोगेन्द्र कवाडे यांनी आज आठवले यांची त्यांच्या संविधान निवासस्थानी भेट घेऊन विचारपूस केली .