जे नको ते मतदारांनी नाकारले : उद्धव ठाकरे
मुंबई: इव्हीएम, पैसा वाटप आणि गुंडागर्दी अशा गोष्टींमध्ये न पडता जनतेने जे नको तेच नाकारले, अशी खोचक आणि मार्मिक प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांवर दिली आहे.
पर्याय कोण, याचा विचार न करता मतदारांनी अगोदर नको आहेत त्यांना उखडून फेकले आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस हा काही मतदारांनी भाजपला पर्याय म्हणून स्वीकारलेला नाही, असा ठाकरे यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.पर्याय कोण या फालतू प्रश्नात न पडता राज्यातील मतदारांनी जे धाडस दाखवले त्यांच्या बेडरपणाचे अभिनंदन करतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. निकालांमुळे विरोधी पक्षांमध्ये आनंदाची लाट असली तरी मित्र पक्षही भाजपला सुनावत असल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.
निवडणुकीत हार जीत होत असतेच. जिंकणाऱ्याचे अभिनंदन होत असते. चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्यांचे आपण अभिनंदन करतो, असेही ठाकरे यांनी पुढे म्हटले. इव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी या मुद्यांवर जनतेने विचार केला नाही. जे नको त्यांना आधी उखडून फेकले. भाजप आता यावर काय उत्तर देणार, याचीही उत्सुकता आहे.