जनतेनेच भाजपाचे रामनाम सत्य केलेय : नवाब मलिक
मुंबई : रामनामाचा जप करणाऱ्या भाजपाचा तीन राज्यात जनतेनेच रामनाम सत्य केले आहे हे आज लागलेल्या निकालावरुन स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
आज पाच राज्यातील निवडणूकांचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये भाजपाला धोबीपछाड करत काँग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपाच्या जनताविरोधी नीतीवर जोरदार टिका केली.
भाजप सरकारच्या काळात देशातील तरुणांवर बेरोजगारीचे संकट आले. तरुणांना रोजगार देतो सांगून त्यांची फसवणूक सरकारने केली शिवाय सरकारने शेतकऱ्यांच्याविरोधातही भूमिका घेतली त्यामुळे हा आक्रोश समोर आला आणि भाजपाला पराभव स्वीकारावा लागला असल्याचे चित्र या पाच राज्यातील निकालावरुन स्पष्ट होत असल्याचेही मलिक म्हणाले.
राजस्थान,छत्तीसगड,मध्यप्रदेश या तीन राज्यामध्ये भाजपाची सत्ता होती परंतु ज्या छत्तीसगडमध्ये त्यांची सत्ता होती तिथेच भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. भाजप सरकारची जनतेच्याविरोधात जी निती होती त्याविरोधात जनतेने मतदान केले आहे असेही मलिक म्हणाले.
भाजप ही निवडणूक जिंकणारी मशीन आहे असे भाजपचे नेते म्हणायचे परंतु ती मशीन आता चालली नाही. आजचे निकाल हे २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूकांमध्ये मोदीविरोधी जनआक्रोश असल्याची झलक आहे असेही मलिक म्हणाले.
२०१४ मध्ये मतांमध्ये झालेली फूट भाजपाच्या विजयाला कारणीभूत ठरली होती. परंतु आता सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत आणि त्यामुळे २०१९ मध्ये मोदींना पराभव पहावा लागेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.