भाजपला जनतेने नाकारले!: विखे पाटील
मुंबई : भारतीय जनता पक्षाने देशाला दाखवलेली स्वप्ने मागील साडेचार वर्षात केवळ स्वप्नेच राहिली. ती प्रत्यक्षात उतरलीच नाहीत. त्यामुळे मध्यप्रदेश,राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यात जनतेने भारतीय जनता पक्षाला नाकारल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवित यश प्राप्त केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, या निकालांच्या माध्यामातून जनतेने मोदी सरकारच्या विरोधाक कौल दिला आहे. तो त्यांनी स्वीकारला पाहिजे. याच निकालाचे प्रतिबिंब पुढील लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर उमटताना दिसेल. त्यामुळे मोदींनी आता सत्तेची स्वप्न बघू नये. जो थोडा वेळ त्यांच्याकडे शिल्लक आहे,किमान तो तरी त्यांनी लोकहितासाठी घालवावा, असा चिमटाही विखे पाटील यांनी काढला.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जनतेचे ‘सच्चे दिन’परत आले आहेत. जाहिरातबाजी, अपप्रचार आणि ‘इव्हेंट’ करून जनतेची काही काळासाठी फसवणूक आणि दिशाभूल केली जाऊ शकते. पण ही बनवाबनवी नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही. जनता सूज्ञ आहे. भाजपकडून आपला विश्वासघात झाल्याची भावना महाराष्ट्रासह संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. त्यामुळेच २०१४ चे वातावरण आता बदलायला लागले आहे. भाजपच्या लोकविरोधी, भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराविरूद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या देशव्यापी आणि सामूहिक संघर्षाला यश आल्याचे या निकालातून दिसून येते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यातील एकूण ६५ पैकी ६२ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण या निकांनी पुढील लोकसभा निवडणुकीत या तीन राज्यात आणि देशात काय चित्र असेल, ते स्पष्ट केले आहे. हा परिवर्तनाचा स्पष्ट संकेत असल्याचा ठाम विश्वास देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.