विकासाचा मुद्दा सोडल्यानेच भाजपचा पराभव : खा संजय काकडे
पुणे:राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये आमचा पराभव होणार हे आम्हाला अगोदरच माहीत होते. परंतु मध्यप्रदेशातील निकाल आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे, असे रोखठोक मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.
खा. काकडे म्हणाले की, छत्तीसगढ आणि राजस्थानात भाजपला जो पराभव पत्करावा लागला तो आम्हाला माहीत होता. परंतु मध्यप्रदेशात कॉंग्रेसला मिळालेले यश आश्चर्यकारक आहे. तेथे कॉंग्रेसने घेतलेली झेप पाहता २०१९ मध्ये भाजपसाठी चिंताजनक परिस्थिती असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या पराभवाची कारणे सांगताना ते म्हणाले की, या निवडणुकीत पक्षाने विकासाचा मुद्दा सोडून दिला. राम मंदिर, शहरांचे नामकरण, हनुमानाची जात काढणे असे भलतेच मुद्दे प्रचारात आणले गेले. त्याचा मतदारांवर नकारात्मक परिणाम झाला. मी राजस्थानात निवडणुकीपूर्वी गेलो तेव्हा तेथील जनतेत सरकारबद्दल नाराजी असल्याचे समजले होते. पण मध्यप्रदेशात कॉंग्रेस शंभरच्या वर जाईल, असे वाटले नव्हते. तेथे संघाचे मोठे जाळे आहे. बूथनिहाय भाजपची यंत्रणा आहे आणि शिवराजसिंह चौहान यांच्याबद्दल जनतेला सहानुभूती आहे, असे काकडे म्हणाले.
जातीपातीचे राजकारण केल्यामुळे २०१४ ला जो विकासाचा अजेंडा घेतला होता तो मागे पडला. ही स्थिती अशीच राहिली तर पक्षासाठी २०१९ मध्ये धोक्याची घंटा ठरेल.