देशात पुन्हा ‘कमळ’च फुलणार : पंकजा मुंडे

देशात पुन्हा ‘कमळ’च फुलणार : पंकजा मुंडे

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला, त्यांच्या अशा संस्कारामुळे समाजातील वंचित पीडित घटकांची सेवा करण्याची ताकद आम्हाला मिळते असे सांगून राज्याच्या ग्रामविकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाजाला मुंडे साहेबांची आठवण सातत्याने येत राहील असेच काम अखेरच्या श्वासापर्यंत करत राहू असा विश्वास व्यक्त केला. गोपीनाथ गडावर बोललेला शब्द खरा ठरतो त्यामुळे देशात पुन्हा ‘कमळ’च फुलणार असल्याचे ठामपणे सांगत महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा हुंकार त्यांनी यावेळी केला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे, आ. आर टी देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस,आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर, फुलचंद कराड, बाबुराव पोटभरे, डाॅ. भागवत कराड, प्रवीण घुगे, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, राजेंद्र मस्के, राजेश देशमुख, धम्मानंद मुंडे, गणेश हाके, डाॅ. स्वरूपसिंह हजारी आदी यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, आज मुंडे यांची जयंती नाही तर वाढदिवस आहे, त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत, हया आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, निवडणूक प्रचारानिमित्त मी जेव्हा तेलंगणा, मध्य प्रदेशात गेले तेव्हा तिथेही त्यांची पूजा होते. त्यांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे. साहेबांचा लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम होत राहील असे कामं माझ्या हातून होतील. माझ्या प्रत्येक भूमिकेचा चेहरा व रंग वेगळा असला तरी आत्मा मात्र मुंडेंचाच आहे, त्यामुळे त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.

हा यज्ञ समाजसेवेचा

दुष्काळात सापडलेल्या गरजू रुग्णांच्या मदतीसाठी आयोजिलेला हा यज्ञ समाजसेवेचा असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की,आर्थिक परिस्थितीअभावी अनेकांना उपचार करणे शक्य होत नाही अशांना मोफत तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रिया अशी सेवा आम्ही देत आहोत. सरकारी डॉक्टरांबरोबरच खासगी डॉक्टरही या सेवेत आहेत. प्रत्येक आजारी माणुस इथून ठणठणीत बरा व्हावा. समाजातील प्रत्येक घटकानेही यात आपापल्या परीने आहुती द्यावी तरच हा यज्ञ यशस्वी होईल असे त्या म्हणाल्या.

जिल्हयाचे राजकारण बदलले

मुंडे गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील गॅगवाॅर संपवले होते तसे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅगवाॅर संपण्यात मला यश मिळाले आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही काम करतो, आता त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेली आहेत,ही मुळं चांगल्या विचाराची व संस्कृतीची आहेत, दहशतीची किंवा कुणाला त्रास देणारी नाहीत असे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्याचा विकास तर एक झांकी आहे अजून खूप कांही करायचे बाकी आहे. मी कधीही तुमच्याच कामाला येणार आहेत, त्यामुळे नकारात्मक भुमिकेत राहू नका, माझ्या सेवेला आशीर्वादाचे बळ द्या असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांवर हल्लाबोल

पंकजा मुंडेंनी यावेळी आपल्या भाषणात राजकारणातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर हल्लाबोल केला. मुंडे यांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले दुःखावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या कांही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नांव मात्र दुसऱ्याचे घेतात असा दुटप्पी पणा फार काळ चालणार नाही.माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका,समोरुन वार करा, हारले तर सन्मानाने हार स्विकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

यावेळी दादा इदाते यांनी आपल्या भाषणात समाजाच्या भल्यासाठी मुंडे यांचे विचार कार्यकर्त्यांनी आत्मसात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. पंकजाताई यांचे नेतृत्व कणखर आहे हे नेतृत्व देशाला मार्गदर्शक ठरेल अशा भावना त्यांनी बोलताना व्यक्त केले

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर आ. आर टी देशमुख,आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, आ. पवार, गोविंदराव केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राधाताई सानप, यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचलन राम कुलकर्णी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक यांनी प्रास्ताविक केले.

क्षणचित्रं

• गोपीनाथ गडावर पोहोचताच प्रज्ञा मुंडे, पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रितम मुंडे, अॅड. यशःश्री मुंडे, अमित पालवे, गौरव खाडे, अगस्त्य खाडे यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ऑडिओ संदेश पाठवून मुंडे यांनि अभिवादन केले. भाजपला बहूजनांचा चेहरा देणा-या साहेबांनी आयुष्यभर संघर्ष करत भाजपला सत्तेपर्यत पोहोचविले. आज आम्ही त्यांच्यामुळेच सत्तेत आहोत अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

• महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच हजारोंच्या संख्येने आलेल्या मुंडे भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

• व्यासपीठावर येण्यापूर्वी पंकजा मुंडे व मान्यवरांनी महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन केले त्यानंतर प्रत्येक स्टाॅलला जावून रूग्णांची आस्थेवाईक पणे विचारपूस केली तसेच डाॅक्टरांचे स्वागत केले.

• दुष्काळी परिस्थितीमुळे कार्यक्रमात सत्कारासाठी कुठलेही हार, तुरे नव्हते तर साहेबांच्या जीवनावरील पुस्तक देवून पाहूण्यांचे स्वागत करण्यात आले.

• पंकजा मुंडे यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून तीन कोटी रूपये खर्च करून जिल्हयातील ३७० तलाठ्यांना लॅपटॉप मंजूर केला त्याचे वितरण यावेळी करण्यात आले. जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यावेळी उपस्थित होते.

• जिल्हयातील तीनशे महिला बचतगटांना स्टेट बँक ऑफ इंडियाने मंजूर केलेल्या तीन कोटी रूपये कर्जाचे वाटप तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना देखील घरकुलाचे वाटपही यावेळी करण्यात आले.

•अंबाजोगाईचे भाजपचे नगरसेवक कमलाकर कोपले यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

• खा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक जण मुंडे यांच्या समाधीवर डोके ठेवतांना त्यांच्या आठवणीने गहिवरून गेला.

Previous articleमुख्यमंत्र्यांना दिलेली नोटीस ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही यासंदर्भात
Next articleमराठा आरक्षणाविरुद्धच्या याचिकेवर ॲड. हरिष साळवे मांडणार शासनाची बाजू