शिवसेनेसोबत युती होणारच : मुख्यमंत्री

शिवसेनेसोबत युती होणारच मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

मुंबई: शिवसेना सातत्याने सामना मधून भाजपवर टीका करते. परंतु शिवसेनेचे तुम्हाला दिसणारे तेवर वेगळे आहेत. आम्हाला शिवसेनेचे वेगळे तेवर माहीत आहेत. आम्ही काही फॉर्म्युले तयार केले आहेत. शिवसेनेशी युती होणारच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजत शर्मा यांनी त्यांची मुलाखत घेतली. तीन राज्यांतील भाजपचा पराभवापासून ते भाजप आमदार संपर्कात असल्याचा राष्ट्रवादीने केलेला दावा पर्यंत विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

राज्यातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे भाजप शिवसेना युती होणार की नाही हाच आहे. यावर रजत शर्मा यांनी विचारले की सामनातून रोज भाजपवर होणारी टीका वाचली तर शिवसेनेशी युती करावी वाटणार नाही. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही सामना वाचतच नाही. शिवसेनेचे तुम्हाला दिसणारे तेवर वेगळे आहेत. आम्ही काही फॉर्म्युले तयार केले आहेत. शिवसेना आमच्यासोबतच राहील. शिवसेनेशी युती होणारच आहे.भाजप हा फक्त दोन व्यक्ती चालवतात असे उद्धव ठाकरेंना वाटते, याबद्दल फडणवीस म्हणाले की, भाजपचा कुणी मालक नाही. हा कुठल्याही परिवाराचा पक्ष नाही. सामान्य कार्यकर्ता येथे नेता होऊ शकतो आणि माझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, असे रोखठोक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, राज ठाकरे हे माझे मित्र आहेत. ते मते मांडतच असतात पण त्यांना कुणी गांभिर्याने घेत नाही. तुम्हीही गंभीरपणे घेऊ नका, असा मिश्कील टोलाही लगावला.

तीन राज्यांतील पराभवाबाबत फडणवीस म्हणाले की आम्ही आत्मपरीक्षण करूच. पण हा पराभव फार मोठा नाही. राजस्थान आणि मध्यप्रदेशात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे त्यांनी अभिनंदनही केले. पंतप्रधान मोदी एकाच व्यक्तीवर टीका करतात, असे शरद पवार म्हणाले होते. त्यांना सडेतोड उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, एकाच व्यक्तीवर टीका करू नये हे पवार यांच्या लक्षात आले असते तर १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापनाच करता आली नसती. तसेच अहंकार हे भाजपच्या पराभवाचे कारण नाही. आम्ही जमिनीशी जोडलेली माणसे आहोत. पराभवातूनच आम्ही इथपर्यंत आलो आहोत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक भाजप आमदार खासदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते.त्यावर कोणता पक्ष रिकामा होतो हे लवकरच समजेल असे सूचक विधान त्यांनी केले.तीन राज्यांत भाजपला नाकारले असे म्हणता येणार नाही.कॉंग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये ०.५ चा फरक आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

Previous articleसीमा भागातील मराठी जनतेला न्याय, त्यांच्या लढ्याला बळ व पाठींबा द्या :मुंडे
Next articleडिएड-बीएड धारकांना खुषखबर : जानेवारीत शिक्षक भरती होणार