कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू होणे लांच्छनास्पद: विखे पाटील
मुंबई : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट बॅंकेसमोर उपोषणाला बसावे लागते आणि आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो, हा प्रकार सरकारसाठी लांच्छनास्पद असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
पाथरी येथे नवीन कर्जाच्या मागणीसाठी स्टेट बॅंकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात तुकाराम वैजनाथ काळे नामक शेतकऱ्याचा मृत्यू होण्याच्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. सरकारच्या धोरणांमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नैराश्य निर्माण झाले आहे. सरकारच्या उदासीन व नकारात्मक धोरणांमुळे हतबल होऊन तिकडे नवी दिल्लीत रिझर्व्ह बॅंकेच्या चेअरमनला देखील राजीनामा द्यावा लागत असून, पाथरीत शेतकऱ्यांना आंदोलन करून हौतात्म्य पत्करावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
सरकारकडून भरीव मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले आहे. कर्जमाफी,दीडपट हमीभाव आणि जलयुक्त शिवार सारख्या घोषणांचे सरकार ढोल बडवत असले तरी या घोषणा फसव्या ठरल्या आहेत. या घोषणा दिलासादायक ठरल्या असत्या तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसले असते. पण दुर्दैवाने आजची परिस्थिती तशी नाही. उलटपक्षी स्टेट बॅंकेसारखी प्रमुख राष्ट्रीयकृत बॅंक शेतकऱ्यांना कर्ज द्यायलाही तयार नाही. त्यामुळेच कधी बॅंकासमोर तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शेतकरी आंदोलन करताना दिसून येत आहे. कधी नव्हे तो त्यांच्यावर संप करण्याची वेळ देखील याच सरकारच्या काळात ओढवली,असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
बॅंकांकडून शेतकऱ्यांना अन्याय्य व अवमानास्पद वागणूक दिली जात असताना सरकार मात्र मौन धारण करून बसले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊन ते एक तर आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत किंवा तुकाराम वैजनाथ काळे यांच्याप्रमाणे तणावग्रस्त होऊन हृदयविकाराला बळी पडत आहेत, या शब्दांत विखे पाटील यांनी उद्वेग व्यक्त केला. सरकारने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना कर्जासाठी आंदोलनास करण्यास भाग पाडणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी,संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि तुकाराम वैजनाथ काळे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.