महाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ ; ४१४ रूग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

महाआरोग्य शिबीराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी घेतला लाभ ; ४१४ रूग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

खा. डाॅ. प्रितमताई मुंडेंनी स्वतः शिबीरात सहभागी होऊन केली रूग्णांची तपासणी

परळी : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त सहकार्याने गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य यज्ञाने आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री  पंकजा मुंडे यांना हजारो गोरगरीब रूग्णांच्या आशीर्वादाचे बळ मिळाले. महाआरोग्य शिबिराचा ७ हजार ७९१ रूग्णांनी लाभ घेतला तर ४१४ रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. जिल्हयाच्या खासदार डाॅ प्रितम मुंडे यांनी अन्य डाॅक्टरांसोबत स्वतः दोन दिवस शिबीरात बसून रूग्णांची तपासणी केली हे या शिबीराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर काल महा आरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले होते. आज या शिबीराचा समारोप झाला. या शिबिराला परळी, अंबाजोगाई व परिसरातील रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राधाकिशन पवार, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख, डाॅ. नितीन चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी असे दोनशेहून अधिक डाॅक्टर्स आरोग्य यज्ञात सहभागी झाले होते. शिबीरात ७ हजार ७९१ स्त्री- पुरूष रूग्णांसाठीच्या ४२ विविध स्टाॅल्समधून कॅन्सर, किडनी यासह ५० हून अधिक रोगांच्या तपासण्या डाॅक्टरांनी केल्या. सोनोग्राफी, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, औषधी वाटप याबरोबरच शेतक-यांना आत्महत्ये पासून परावृत्त करण्याबाबत मार्गदर्शन तसेच तंबाखू व्यसनमुक्ती नियंत्रण, एड्स, मलेरिया, क्षयरोग याविषयी जनजागृती, किशोरवयीन मुला मुलींना मार्गदर्शन, महात्मा फुले जीवनदायी योजना व पंतप्रधान जनआरोग्य योजनेविषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. जयपूर फुट व अपंगाना विविध साहित्याचे वितरणही यावेळी करण्यात आले.

आरोग्य यज्ञ झाला सफल

पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या आरोग्य यज्ञाचा दुष्काळात सापडलेल्या गोरगरीब रूग्णांना ख-या अर्थाने फायदा झाला. आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांना आजारांवर उपचार घेणे शक्य नव्हते ते या शिबीरामुळे शक्य झाले. शिबीरात रूग्णांची केवळ तपासणीच नव्हे तर औषधोपचार आणि शस्त्रक्रियाही मोफत उपलब्ध झाल्याने गोरगरीब रूग्णांनी मुंडे भगिनींना मनापासून आशीर्वाद दिले.

खा.डाॅ. प्रितमताई मुंडेंनी केली तपासणी

खासदार डाॅ प्रितम मुंडे हया स्वतः त्वचारोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून या शिबीराचे उत्कृष्ट नियोजन तर केलेच शिवाय डाॅक्टर म्हणून स्वतः दोन्ही दिवस इतर डाॅक्टरांच्या बरोबरीने शिबीरात बसून रूग्णांच्या तपासण्या केल्या. डाॅक्टर व खासदार अशा दोन्ही भुमिका अगदी सहजपणे पार पाडत असतांना त्यांच्याविषयी रूग्णांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.

डाॅक्टरांनी बजावली महत्वपूर्ण भूमिका

या शिबीरात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी व खासगी डाॅक्टरांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली. परळी उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रामेश्वर लटपटे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. बालासाहेब लोमटे, डाॅ. हरदास, डाॅ. हरिश्च॔द्र वंगे, डाॅ. सुर्यकांत मुंडे, डाॅ. राजाराम मुंडे, डाॅ. मधूसुदन काळे, डाॅ. बालासाहेब कराड, डाॅ. ज्ञानेश्वर घुगे, डाॅ. सतीश गुठे, डाॅ. लक्ष्मीनारायण लोहिया, डाॅ. अर्शद शेख, डाॅ. सचिन भावठाणकर, डाॅ. अनिल घुगे, डाॅ. शीतल गायकवाड, डाॅ. पवार, डाॅ. मुकूंद सोळंके, डाॅ. अजय मुंडे, डाॅ. अजित केंद्रे, डाॅ. गुरूप्रसाद देशपांडे, डाॅ. विजय रांदड, डाॅ. शालिनी कराड, डाॅ. वैशाली गंजेवार, डाॅ. दैवशाला घुगे, डाॅ. रंजना घुगे, डाॅ. नेहा अर्शद, डाॅ. सुनिता झंवर यांनी यासाठी परिश्रम घेतले.

४१४ रूग्णांवर होणार शस्त्रक्रिया

महाआरोग्य शिबिरात पुढीलप्रमाणे रूग्णांनी लाभ घेतला त्यात प्रामुख्याने
औषधी – ४७६, सर्जरी – ३१३, स्त्रीरोग – १४८, बालरोग १९७, त्वचारोग – ४६३, अस्थीरोग – १०५६, नेत्ररोग – १५६०, मानसोपचार – ६८, दंतरोग- २२६, असंसर्गजन्य रोग -१०२, आयुष – २६०,अग्निकर्म – २२०, कान नाक घसा – ३२२,किशोर स्वास्थ्य – ९४ संसर्गजन्य – १२६,फिजियोथेरपी- १५२, कृत्रिम अवयव – १७ आयसीटीसी – १९२, सोनोग्राफी – ४०५,ईसीजी-१६८, अपंग साहित्य- १५३ तंबाखु नियंत्रण – ५९, प्रयोगशाळा – ५५०,शस्त्रक्रिया करण्यात येणा-या ४१४ रूग्णांमध्ये जनरल सर्जरी- ७०,मोतीबिंदु २१५, स्त्रीरोग- ५७ व इतर ७२ अशा शस्त्रक्रिया होणार आहेत. जनरल सर्जरी १७ ते २२ डिसेंबर, स्त्रीरोग शस्त्रक्रिया २४ ते २९ डिसेंबर तर इतर शस्त्रक्रिया ३१ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान उप जिल्हा रूग्णालयात मोफत करण्यात येणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया हया आठवड्यातून दोन वेळा होणार आहे. शस्त्रक्रियांच्या तारखा संबंधित रूग्णांना कळविण्यात आल्या असून रूग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा. डाॅ. प्रितम मुंडे यांनी केले आहे.

Previous articleकर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू होणे लांच्छनास्पद: विखे पाटील
Next articleFarmers can not live on your empty promises and speeches : Uddhav Thackrey