कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत आठ जागांचा तिढा !
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १९ आणि २० डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागा वाटपाची चर्चा होणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यापैकी ४० जागांबाबत कोणताच वाद नाही असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून,वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल ,असे सांगण्यात येते.
जागा वाटपाची महत्वपूर्ण बैठक विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे.ज्या जागांबद्दल वाद आहेत त्यात यवतमाळ, पुणे अशा काही मतदारसंघांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादीला हवी असून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना तेथून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवायची आहे. परंतु जागा वाटपात हा मतदार संघ कॉंग्रेसकडे आहे. कॉंग्रेसचा राणे यांना महाआघाडीत घेण्यास विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राणे यांचे वैर सर्वांनाच माहित आहे. खुद्द चव्हाण यांचा राणेंना विरोधच आहे. कॉंग्रेस राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना उमेदवारी देण्यास तयार आहे, असेही समजते.मात्र राणेंसाठी ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यास कॉंग्रेस तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे. या सर्वच मुद्यांवर दोन दिवसीय बैठकीच्या चर्चेतून मार्ग काढण्यात येण्याची शक्यता आहे.
दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. भाजप शिवसेना युती होण्याबाबत काहीच स्पष्टता नसताना कॉंग्रेस राष्ट्रवादीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे.