कांदा उत्पादकांना लवकरच दिलासा : सदाभाऊ खोत
सांगली: राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला कांदा पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळी कांदा ग्राहकांऐवजी उत्पादकांना रडवतो आहे.परंतु कांदा उत्पादकांसाठी लवकरच दिलासा देणारा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. कांदा खरेदी दरात तीन ते चार रूपयांची वाढ केली जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढील आठवड्यात याबाबत घोषणा करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे, अशीही माहिती खोत यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने यापूर्वीही मदत केली आहे. आताही सरकार प्रयत्नशील आहे. निर्यात अनुदानासाठी आता दहा टक्क्याची मागणी करण्यात आली आहे. निर्यात शुल्क शून्य असून वर्षभर तसेच ठेवावे, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असल्याचेही खोत यांनी सांगितले.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अत्यल्प दर मिळाल्यामुळे पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना मिळालेली छोटीशी रक्कम मनी ऑर्डरने पाठवण्याचा सपाटा लावला आहे. निवडणुकीत कांदा हा सरकारला अडचणीत आणणारा मुद्दा ठरू शकतो, हे ओळखून सरकारने निर्णय घेण्याची घाई सुरू केली आहे.