नरेंद्र मोदींनी दुष्काळी दौरा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी: विखे पाटील

नरेंद्र मोदींनी दुष्काळी दौरा करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी: विखे पाटील

मुंबई : येत्या १८ डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि त्यांना थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या १८ डिसेंबरच्या नियोजित कल्याण दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ-मोठी आश्वासने दिली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांना एकदाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विचारपूस करायला वेळ मिळाला नाही. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड देतो आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढतेच आहे. तरीही पंतप्रधान राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना दिलासा द्यायला फिरकले नाही.

यंदा महाराष्ट्र तीव्र दुष्काळाला तोंड देत असून, हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर असल्याचे वास्तव आहे. या परिस्थितीत पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना थेट व भरीव आर्थिक मदत जाहीर करण्याची आवश्यकता आहे. परंतु, नेहमीप्रमाणे यावेळीही पंतप्रधानांनी ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा टाळला आहे. मध्यंतरी केंद्राच्या पथकाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची पाहणी केली. दुष्काळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने एनडीआरएफमधून केंद्र सरकारकडे ७ हजार कोटी रूपयांची मागणी केली आहे. मात्र अद्याप ही मदत राज्य सरकारला मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान केवळ मेट्रोच्या भूमिपूजनासाठी येत असतील तर ती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा ठरेल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपची सरकारे उलथवून लावल्याने आजवर शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष कऱणारे केंद्र सरकार आता खडबडून जागे झाले आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी ४ लाख कोटी रूपयांची कर्जमाफी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा खरी असेल तर केंद्र सरकारने सरसकट कर्जमाफी करावी. महाराष्ट्रातील राज्य सरकारप्रमाणे अटी व निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नयेत, असेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.

Previous articleमाजी खासदार निवेदिता माने उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
Next articleविजय माल्ल्यालाही भाजपात प्रवेश द्या : अशोक चव्हाणांची टीका