भिडे गुरुजींची व्याख्यानमाला उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा 

भिडे गुरुजींची व्याख्यानमाला उधळून लावण्याचा भीम आर्मीचा इशारा 

मुंबई : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या मुंबई शाखेने भीमा कोरेगाव मध्ये गेल्यावर्षी झालेल्या दंगलीतल्या प्रकरणात चर्चेत आलेले संभाजी भिडे गुरुजी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम लालबाग मध्ये आयोजित करण्यात आला असला तरी भीम आर्मी सह काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे . कार्यक्रम आयोजित केल्यास अनेक संघटनांचे कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावतील असा इशाराही भीम आर्मीने दिला आहे .

येत्या रविवारी १६ डिसेंबरला  लालबाग येथे गणेश मैदानात  मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या  व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . मात्र संभाजी भिडे हे जातीय तेढ वाढवत असल्याचे मागील अनेक प्रकरणांवरून दिसून येत आहे . गेल्या वर्षी भीमा -कोरेगाव येथे  दंगलीला ही भिडे जबाबदार असल्याची तक्रार पुण्यात नोंदवण्यात आली आहे . त्यामुळे कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे पत्र भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी मुंबई आयुक्तांना  दिले  आहे . भिडे संविधान मनात नसून मनुस्मुती श्रेष्ठ असल्याचा दावा करतात , चिथावणीखोर भाषण करून जनतेत प्रक्षोभ निर्माण करत असल्याचा आरोपही कांबळे यांनी केला आहे . पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिल्यास संविधान मानणाऱ्या अनेक जाती धर्मातील जनता हा कार्यक्रम उधळून लावतील असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे . मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमामुळे निर्माण होणार कायदा सुव्यवस्थेबाबत विचार करून कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे .

भीम आर्मी सोबतच  दलित युथ पॅंथरने ही भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे . या व्याख्यानाला  परवानगी  देऊ नये ह्या मागणीचे निवेदन पँथरचे  सचिव  निलेश मोहिते  यांनी मुंबई पोलिस आयुक्त,परिमंडळ ३ व ४ चे पोलिस उपायुक्त व स्थानिक पोलिस ठाण्याला दिले आहे .  काळा चौकी ह्या स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक आव्हाड आणि परिमंडळ ४ च्या पोलिस उपायुक्त एन अंबिका यांनी सादर कार्यक्रमाला अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगितले आहे . तरी ही  सदर कार्यक्रम होत असेल तर दलित युथ पॅंथर तो कार्यक्रम हाणुन पाडेल असा इशारा मोहिते यांनी दिला आहे .

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या  वतीने भीमा कोरेगावच्या दंगल झाल्यांनतर मार्च महिन्यात ही संभाजी  भिडे गुरुजी यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती . यासंदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या आयोजकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणीही उपलब्ध झाले नाही .

Previous articleग्रामविकास विभागासाठी २०१४ मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या द्या
Next articleओबीसी-मराठा झुंज सरकारने लावली : प्रकाश आंबेडकर