मेट्रो मार्गातही भाजपकडून राजकारण : राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप
ठाणे:मेट्रो ५ प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा कल्याणमध्ये पार पडत असताना राजकीय वादही पेटला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या प्रकल्पास जोरदार विरोध केला आहे. हा मार्ग प्रवाशांसाठी फायदेशीर नाही, असा दावा आमदार जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे आणि मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. भाजपचे प्राबल्य असलेल्या भिवंडीतून मेट्रो नेण्याचा घाट घालून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.यामुळे मोठा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे.
कल्याण-भिवंडी-ठाणे मेट्रो मार्ग कापूरबावडीवरून कोल्हेर, कशेरी मार्गे कल्याण एपीएमसी मार्केटपर्यंत जाणार आहे. मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या फार कमी आहे, असा दावा आव्हाड यांनी केला. कळवा, मुंब्रा, कौसा, दिवा, ठाकुर्ली या भागात प्रचंड नागरीकरण झाले असून येथून मेट्रो नेल्यास प्रवाशांची संख्या फार मोठी असेल.मेट्रोला प्रवासी भरपूर मिळतील आणि मेट्रोला उत्पन्नही दुपटीने मिळेल, असे राष्ट्रवादीचे नेते म्हणाले.
सध्याचा मार्ग भाजपचे प्राबल्य असलेल्या भिवंडीतून नेण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाबाबतही भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमीपूजनाचा घाट ही मतदारांची फसवणूक असल्याचा गंभीर आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.